अशोकराव वग्याणी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:40+5:302021-09-02T04:57:40+5:30
आष्टा : सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-संचालक व येथील शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष, महिला पतसंस्थेचे मार्गदर्शक अशोकराव चंद्रकांत वग्याणी (वय ...

अशोकराव वग्याणी यांचे निधन
आष्टा : सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-संचालक व येथील शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष, महिला पतसंस्थेचे मार्गदर्शक अशोकराव चंद्रकांत वग्याणी (वय ६७) यांचे मंगळवारी रात्री आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व राजारामबापू बँकेच्या संचालिका अनिता वग्याणी, मुलगा ॲड. अभिजित वग्याणी, मुलगी, जावई, सून व नातवंडे, असा परिवार आहे.
अशोकराव वग्याणी यांचा जन्म समडोळी (ता. मिरज) येथे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना पोहण्याची व पैलवानकीची आवड होती. त्यातूनच सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार व व्यंकाप्पा पत्की यांच्याशी त्यांची मैत्री जमली. त्यांच्या विविध आंदोलनांत अशोकराव वग्याणी उपस्थित असत. शेतकरी, कामगार व उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी लढा दिला. आष्टा शहरातील सर्वच राजकीय पक्षांत त्यांचे आपुलकीचे संबंध होते. सर्वोदय सहकारी साखर कारखाना उभारणीवेळी संभाजी पवार, व्यंकाप्पा पत्की यांच्यासोबत त्यांनी अहोरात्र काम केले. ते कारखान्याचे संचालक होते. लोकनेते राजारामबापू पाटील आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे ते निष्ठावान कार्यकर्ते होत.
आष्टा शहरातील सर्वसामान्यांना आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी शिवशक्ती पतसंस्था व महिला पतसंस्थेच्या माध्यमातून काम केले. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांच्या निधनाने आष्टा शहरातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.