अशोकराव गायकवाड भाजपच्या संपर्कात

By Admin | Updated: September 1, 2014 23:09 IST2014-09-01T22:17:39+5:302014-09-01T23:09:15+5:30

विट्यात काँग्रेसलाही खिंडार : ९ सप्टेंबरला प्रवेशाची शक्यता

Ashokrao Gaikwad in contact with BJP | अशोकराव गायकवाड भाजपच्या संपर्कात

अशोकराव गायकवाड भाजपच्या संपर्कात

दिलीप मोहिते - विटा -खानापूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर आता येथील विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड हेही कॉँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला गायकवाड समर्थक कार्यकर्त्यांनी दबक्या आवाजात दुजोरा दिला आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघात आता राष्ट्रवादीपाठोपाठ कॉँग्रेसलाही खिंडार पडण्याची शक्यता आहे. येत्या ९ सप्टेंबरला भाजपच्या प्रदेश नेतेमंडळींच्या उपस्थितीत गायकवाड कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते.
विटा नगरपरिषदेवर गेल्या तीन पिढ्यांपासून वर्चस्व ठेवणारे कॉँग्रेसचे विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक म्हणून विकास आघाडीचे नेते गायकवाड यांची जिल्ह्याला ओळख आहे. परंतु, २०११ च्या पालिका निवडणुकीत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या मध्यस्थीतून आ. पाटील व गायकवाड यांची ‘ऐक्य एक्स्प्रेस’ रूळावर आली. मात्र गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून ही ऐक्य एक्स्प्रेस घसरू लागली आहे. विकास आघाडी समर्थक कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे गायकवाड यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाब वाढू लागला. त्यामुळे आता या ऐक्य एक्स्प्रेसने कायमचाच ‘थांबा’ घेतला आहे.
राष्ट्रवादीपाठोपाठ आता गायकवाड यांच्या रूपाने कॉँग्रेसचा मोहराही महायुतीच्या गळाला लागल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गायकवाड यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉँग्रेसवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील काँग्रेस पक्षाला हा जबर हादरा मानला जाणार आहे.

Web Title: Ashokrao Gaikwad in contact with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.