अरुण लाड यांची बंडखोरी

By Admin | Updated: May 30, 2014 01:03 IST2014-05-30T01:02:58+5:302014-05-30T01:03:21+5:30

मेळाव्यात घोषणा : पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी अर्ज दाखल करणार

Arun Lad's rebellion | अरुण लाड यांची बंडखोरी

अरुण लाड यांची बंडखोरी

कुंडल : राष्ट्रवादीचे नेते, क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांनी आज, गुरुवार पुणे पदवीधर मतदारसंघातून बंडखोरी जाहीर केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असून, सोमवारी (२ जून) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी कुंडल (ता. पलूस) येथे आयोजित निर्धार मिळाव्यात केली. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, गजेंद्र ऐनापुरे यांनी मेळाव्यास उपस्थित राहून लाड यांना पाठिंबा दिला. लाड म्हणाले की, क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंच्या विचाराने व मार्गदर्शनाने समाजकार्य केले. दहा हजार सभासद नोंदणी करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षाकडे काही मागितले नाही, परंतु कामाची संधी मिळावी म्हणून पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने थांबण्यास सांगितले. यावेळेसही उमेदवारी दिली नाही. मी पक्षावर किंवा नेत्यांवर नाराज नाही. कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या विश्वासाने निवडणूक लढवत आहे. शिक्षक, वकील व विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, लाड यांच्यासोबत आपण प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचे काम केले. जिल्ह्णातील सर्व नेत्यांनी लाड यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. आम्ही मंडळी पक्षाशिवाय निवडून येणारी आहोत. कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. पक्षाने अजूनही लाड यांच्या उमेदवारीबाबत विचार करावा. गजेंद्र ऐनापुरे म्हणाले की, निवडणूक लढविण्याचा लाड यांचा योग्य निर्णय आहे. टी. डी. एफ. संघटनेने त्यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी लालासाहेब यादव, मिलिंद पाटील, किरण शिंदे, तुषार काळे, प्राचार्य प्रकाश कुंभार, प्राचार्य तुकाराम पाटील, शिवाजीराव आडसुळे, प्रा. एल. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विजय पाटील यांनी स्वागत, तर प्रा. डॉ. प्रताप लाड यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मेळाव्यात युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, व्ही. वाय. पाटील, सुरेश यादव, प्रा. बाबूराव लगारे, आर. एम. पाटील, प्रकाश पाटील, सरपंच धनश्री पवार, उपसरपंच राजेंद्र लाड, प्राचार्य डॉ. पी. आर. पवार, सुमनताई गायकवाड, वसंतराव लाड, माजी जि. प. सदस्य कुंडलिक एडके उपस्थित होते. माणिक गोतपागर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Arun Lad's rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.