एटीएमची अदलाबदल करून गंडा घालणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:25+5:302021-09-14T04:31:25+5:30
सांगली : एटीएम बाहेर थांबून वयोवृद्धांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदालबदल करून पैसे काढून घेणाऱ्या तरुणास एलसीबीच्या ...

एटीएमची अदलाबदल करून गंडा घालणाऱ्यास अटक
सांगली : एटीएम बाहेर थांबून वयोवृद्धांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदालबदल करून पैसे काढून घेणाऱ्या तरुणास एलसीबीच्या पथकाने अटक केली. अमोल दिलीप सकटे (वय २९, रा. सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव असून विश्रामबाग पोलिसांत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवार, दि. ३ रोजी शिवपुत्र इराप्पा सोलापुरे (रा. लक्ष्मी नारायण कॉलनी, सांगली) हे मार्केट यार्डसमोरील एका एटीएममध्ये पैसे काढण्यास गेले होते. तिथे पैसे न निघाल्याने ते तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या एटीएमवर बॅलन्स चेक करण्यासाठी गेले होते. यावेळी एटीएमबाहेर उभ्या असलेल्या एकास त्यांनी एटीएम कार्ड देत बॅलन्स चेक करण्यास सांगितले. त्या तरुणाने एटीएमचा पासवर्ड पाहून आपल्याकडील दुसऱ्याचे कार्ड सोलापुरे यांना दिले व त्यांच्या कार्डवरून एक लाख ३१ हजार ५१८ रुपये काढून घेतले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सोलापुरे यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.
एलसीबीचे पथक अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्यांची माहिती घेत असताना, पथकाला समजले की, शहरातील त्रिमूर्ती पोलीस चौकीजवळ एक तरुण थांबला असून त्याच्या हालचाली संशयास्पद आहेत.
पथकाने त्यास ताब्यात घेत झडती घेतली त्यात त्याच्या जवळ बँकांची ५ डेबिट कार्ड, इतर बँकांची ५ एटीएम कार्ड मिळून आली. याबाबत तो समाधानकारक माहितीही देऊ शकला नाही. पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत त्याने सांगितले की, एटीएम बाहेर थांबून वयोवृद्धांना पैसे काढण्यास सांगितले की पैसे काढत असताना, पासवर्ड बघून एटीएम बदलून त्याव्दारे रक्कम काढून घेतो. आठ दिवसांपूर्वी सोलापुरे यांना अशाचप्रकारे गंडा घातल्याचीही कबुली त्याने दिली. त्याच्याकडून मोटार सायकलीसह ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र जाधव, नीलेश कदम, अरुण औताडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.