दारू सोडण्याचे औषध देणाऱ्या लाडेगावच्या भोंदू वैद्यास अटक
By Admin | Updated: March 18, 2015 00:05 IST2015-03-17T23:52:24+5:302015-03-18T00:05:08+5:30
मृत तरुणावर घरनिकीत अंत्यसंस्कार : अन्य सातजणांच्या प्रकृतीत सुधारणा; कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग

दारू सोडण्याचे औषध देणाऱ्या लाडेगावच्या भोंदू वैद्यास अटक
विटा / इस्लामपूर : दारूचे व्यसन सोडण्यासाठी घरनिकी (ता. आटपाडी) येथील सातजणांना तेल व एका विशिष्ट पावडरचे मिश्रण पाण्यातून पिण्यास देऊन एकाच्या मृत्यूस, तर अन्य सहाजणांच्या विषबाधेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चंद्रकांत जिनू नाईक (वय ५५, रा. लाडेगाव, ता. वाळवा) यास मंगळवारी पोलिसांनी अटक केली. विटा पोलिसांतून संबंधित गुन्हा वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर संशयितास पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी जीपचालक किसन मेटकरी (रा. घरनिकी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
घरनिकी येथील आठजण सोमवारी लाडेगाव (ता. वाळवा) येथे दारूचे व्यसन सोडण्याचे औषध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुपारी अडीच वाजता संशयित चंद्रकांत नाईक याने त्याच्या राहत्या घरात या आठजणांना तेल व एका विशिष्ट अनोळखी पावडरचे मिश्रण पाण्यातून पिण्यास दिले. त्यानंतर हे सर्वजण घरी परतत असताना खंबाळे (भा.) गावाजवळ त्यांना उलट्या सुरू झाल्या.
त्यानंतर विट्यातून बाहेर पडल्यानंतर औषध पिलेल्या सर्वांनाच उलट्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला. यावेळी लक्ष्मण महादेव माने (३४) या तरुणाचा मृत्यू झाला, तर जनार्दन मेटकरी, तुकाराम माने, उमेश माने, विक्रम परीट, बबन पवार, रमेश माने यांना उपचारासाठी विटा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नाईकला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी
मुख्य संशयित चंद्रकांत जिनू नाईक-मदने (वय ५५, रा. लाडेगाव) याला येथील न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भा. दं. वि.च्या कलम ३०४ (अ) ३२८, महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ (२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी किसन आनंदा मेटकरी (३५, रा. घरनिकी, ता. आटपाडी) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. ही फिर्याद अधिक तपासासाठी कुरळप पोलिसांकडे वर्ग केली आहे. स. पो. नि. सचिन कांबळे अधिक तपास करीत आहेत.