ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:16+5:302021-04-06T04:25:16+5:30
कडेगाव : ऊस वाहतूक कंत्राटदारांना ऊस तोड मजूर पुरविण्याचा करार करून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोन ...

ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांना अटक
कडेगाव :
ऊस वाहतूक कंत्राटदारांना ऊस तोड मजूर पुरविण्याचा करार करून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोन मुकादमांना चिंचणी वांगी पोलिसांनी वेशांतर करून बेड्या ठोकल्या आहेत. प्रकाश गणा राठोड (रा. मोहाडी, जि. जालना) व साजन परशराम राठोड (वय २३, रा. निरखेडा, जि. जालना) अशी अटक केलेल्या मुकादमांची नावे आहेत.
सोनसळ (ता. कडेगाव) येथील संपत भाऊ जाधव यांच्याकडून ९ लाख ३० हजार रुपये तसेच तडसर येथील जयसिंग पवार यांच्याकडून ४ लाख रुपये घेऊन प्रकाश राठोड या मुकादमाने फसवणूक केली व ऊसतोड मजूर पुरविले नाहीत; तर शिरसगाव (ता. कडेगाव) येथील विजय दत्तात्रय मांडके यांच्याकडून साजन परशराम राठोड या मुकादमाने ६ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली होती.
याप्रकरणी चिंचणी (वांगी) पोलिसात दोन्ही मुकादमांवर गुन्हा दाखल झाला होता. चिंचणी वांगी पोलीस
तपास करीत होते. आरोपींना अटक करण्याकरिता पोलिसांचे पथक जालना येथ जाऊन आरोपीचा शोध घेत होते. परंतु आरोपी पोलिसांना चकवा देऊन पळून जात होते. सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमर जंगम हे वेशांतर करून मोहाडी व निरखेडा या तांड्यामध्ये फिरत राहिले. दोन्ही आरोपींना सहकारी पोलीस अशोककुमार परीट, जगदीश मोहिते यांच्या मदतीने सापळा रचून जेरबंद केले.
आरोपींना कडेगाव न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी
दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार गोविंद चन्ने करीत आहेत.