शिराळ्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक
By Admin | Updated: March 16, 2015 00:10 IST2015-03-15T22:41:00+5:302015-03-16T00:10:46+5:30
संशयित मूळचा कऱ्हाडचा : सहा जिवंत काडतुसे जप्त

शिराळ्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक
शिराळा : येथील औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावरील दुकानात शिराळा पोलिसांनी छापा टाकून नीलेश दत्तात्रय पाटील (वय २७, रा. आटके, ता. कऱ्हाड, सध्या रा. कदम गल्ली, शिराळा) याच्याकडून एक गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे, दोन वापरलेली काडतुसे जप्त केली. पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी (दि. १४) रात्री ८.३५ च्या दरम्यान औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावरील बाळसिध्द फर्निचर दुकानात बसलेल्या नीलेश पाटील याला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. अनिल गुजर, फौजदार दिलीप वायकर, एस. डी. सुपनेकर, बी. के. पाटील, अनिल पाटील, जयकुमार उपळे, प्रवीण सुतार, संग्राम कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याच्याकडून बेकायदा गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे, तसेच दोन वापरलेली काडतुसे असा वीस हजार तीनशे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आटके (ता. कऱ्हाड) याठिकाणी त्याच्यावर इतर गुन्हे नोंद आहेत काय, याचा तपास शिराळा पोलीस करीत आहेत. तपास फिर्याद सहायक पोलीस फौजदार एस. डी. सुपनेकर करीत आहेत. रविवारी शिराळा न्यायालयात आरोपीस हजर करण्यात आले असता, त्यास मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (वार्ताहर)