टेंभूच्या पाण्यासाठी अधिकाऱ्यांना घेराओ
By Admin | Updated: August 13, 2014 23:31 IST2014-08-13T21:37:45+5:302014-08-13T23:31:53+5:30
देविखिंडीत आंदोलन : आंदोलक शेतकऱ्यांना अटक व सुटका

टेंभूच्या पाण्यासाठी अधिकाऱ्यांना घेराओ
विटा : खानापूर पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेच्या टप्पा क्र. ४ व ५ साठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामे तातडीने पूर्ण करावीत यासह टेंभूच्या पाण्यासाठी आज बुधवारी देविखिंडी (ता. खानापूर) येथे संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. तत्पूर्वी टेंभूच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी पाणी अडविण्यासाठी कालव्याकडे धाव घेतली. त्यावेळी भक्तराज ठिगळे यांच्यासह दहा आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पाणी अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
खानापूर तालुक्याच्या पूर्व भागाला टेंभूचे पाणी देण्यासाठी टप्पा क्र. ४ व ५ चा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु, या कामांना निधीच मिळत नसल्याने ही दोन्ही कामे सध्या बंद आहेत. त्यामुळे शेतकरी सेनेचे ठिगळे, अरुण माने यांच्यासह सुमारे तीनशे ते चारशे शेतकऱ्यांनी आज बुधवारी देविखिंडी येथे टेंभू योजनेच्या बोगद्याजवळ जाऊन पाणी अडविणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल होती.
आज बुधवारी सकाळी पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांच्यासह सुमारे ५० ते ६० पोलिसांचा ताफा आंदोलनस्थळी दाखल झाला. त्यानंतर पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्ते दाखल झाले. त्यावेळी टेंभूचे कार्यकारी अभियंता डी. एस. मोहिते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी घेराव घातला. यावेळी अभियंता मोहिते यांनी आंदोलकांना टप्पा क्र. ४ व ५ करिता लागणाऱ्या विद्युत जोडणी संबंधीचे कळयंत्र आवारातील ३३ केव्ही ट्रान्स्फॉर्मर उभारणीचे काम प्रगतीपथावर असून, उर्वरित कामांना तांत्रिक मंजुरी घेऊन निविदा कार्यवाही हाती घेण्यात येईल, असे सांगितले.
मात्र यामुळे आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे भक्तराज ठिगळे, लहू पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी टेंभूच्या कालव्याकडे आपला मोर्चा वळवला. त्याचवेळी विटा पोलिसांनी ठिगळे, लहू पाटील यांच्यासह आठ आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, सांगोला तालुक्यात जाणारे टेंभू योजनेचे पाणी अडविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी मुबारक शेख, विलास शिंदे, मारुती शिंदे, कुंडलिक बाबर, तानाजी बाबर, सोमनाथ वाले, अरविंद निकम, सयाजी निकम, प्रकाश निकम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)