अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधीवेळी वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:38+5:302021-05-23T04:26:38+5:30
सांगली : अंत्यविधीसाठी डिझेल नसल्याने सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री दोन तास मृताच्या नातेवाईकांना ताटकळत बसावे लागले. यावेळी ठेकेदार ...

अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधीवेळी वादावादी
सांगली : अंत्यविधीसाठी डिझेल नसल्याने सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री दोन तास मृताच्या नातेवाईकांना ताटकळत बसावे लागले. यावेळी ठेकेदार व मृताचे नातेवाईक यांच्यात वादावादी झाली. अंत्यविधीच्या ठेक्याचा खेळखंडोबा तात्काळ थांबवावा, अशी मागणी मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी शनिवारी आयुक्तांकडे केली.
शुक्रवारी रात्री दोन वाजता अंत्यविधीसाठी गेले असता, लाकडे आहेत, पण डिझेल नाही म्हणून तब्बल दोन तास नातेवाईकांना ताटकळत बसावे लागले. अंत्यविधीच्या ठेकेदाराबरोबर नातेवाईकांनी ठेकेदाराला याबाबत विचारणा केल्यानंतर जोरदार वादावादी झाली. यापूर्वीही याच कारणावरून पाच ते सहावेळा वादावादीच्या घटना घडल्या आहेत.
अंत्यविधीचे साहित्य घेण्यासाठी सांगलीवाडीला जावे लागते. याआधी अंत्यविधीचे साहित्य सांगली स्मशानभूमीच्या शेजारीच असलेल्या शेडमधून मिळत होते. मागील आठ दिवसांपासून अंत्यविधीचे साहित्य आणण्यासाठी सांगलीवाडीला जावे लागत आहे. त्यामुळे वादावादीच्या घटना होत आहेत. याप्रश्नी मदन भाऊ युवा मंचचे लेंगरे यांनी आयुक्तांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सांगली स्मशानभूमीमध्ये सांगली परिसरातील अंत्यविधी होतात. असे असताना सांगलीवाडीत साहित्य आणण्यासाठी का जायचे? ही गैरसोय होत आहे. यापूर्वी सांगली स्मशानभूमीशेजारी साहित्य उपलब्ध होते. त्याचप्रमाणे सांगली स्मशानभूमीशेजारीच साहित्य देण्याची सोय करण्यात यावी. अंत्यविधीच्या ठेकेदाराला वारंवार भोंगळ कारभार करूनसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी समज दिलेली नाही. रात्री-अपरात्री जर दोन तास डिझेल नाही म्हणून मृतदेहाला अग्नी देता येत नसेल, तर यासारखा हलगर्जीपणा नाही. हा माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार आहे. याप्रश्नी आयुक्त नितीन कापडणीस यांनी लक्ष घालून कार्यवाही करावी व ठेकेदाराला समज देऊन अंत्यविधीच्या साहित्याचा पुरवठा हा सुरळीत करण्याबाबत आदेश द्यावेत, अन्यथा मदनभाऊ पाटील युवा मंचच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.