राष्ट्रवादीत पदे भरणे आहेत हो!
By Admin | Updated: November 11, 2014 23:18 IST2014-11-11T23:02:38+5:302014-11-11T23:18:03+5:30
पन्नासभर रिक्त पदे : जिल्ह्यातील आठ कार्यकारिणी रिक्त

राष्ट्रवादीत पदे भरणे आहेत हो!
सांगली : राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत आता अनेक पदे रिक्त झाली आहे. सांगली शहर जिल्हाध्यक्ष पदासह महापालिका क्षेत्रातील तिन्ही शहरांची कार्यकारिणी, पलूस-कडेगाव आणि आटपाडी या दोन तालुक्यातील पदे रिक्त आहेत. याशिवाय निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पक्षनिरीक्षकाचेही पद आता रिक्त झाले आहे. इतके मोठे खिंडार पक्षाला पडल्याने पदांच्या नियुक्तीबाबतही निरुत्साह दिसून येत आहे.
यापूर्वी शहर जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार दिनकर पाटील यांच्याकडे होता. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या पदाचा त्यांनी राजीनामा दिला. संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त झाली. महापालिका क्षेत्राचीच कार्यकारिणी रद्द झाल्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांची कार्यकारिणीही आता नव्याने तयार करावी लागणार आहे. या पदासाठी संजय बजाज, प्रा. पद्माकर जगदाळे यांची नावे चर्चेत आहेत. पलूस-कडेगावमध्ये ज्यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीची धुरा होती, ते पृथ्वीराज देशमुखही भाजपमध्ये गेल्यामुळे तालुका कार्यकारिणीवरील त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. त्यामुळे याठिकाणीही पदांची भरती राष्ट्रवादीला करावी लागेल. आटपाडीतही आता तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी रिक्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे पक्षाला भरावी लागतील.
सांगलीच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाबरोबरच चार उपाध्यक्ष, एक सचिव, खजिनदार तसेच तिन्ही शहरांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य कार्यकारिणी निवडावी लागेल. रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या करून पक्षीय कामकाज चालू व्हावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत असतानाच, जिल्ह्यातील नेते याबाबत मौन बाळगून आहेत. माजी मंत्री जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांच्यावरच आता नव्या कार्यकारिणी निवडीची जबाबदारी आहे. प्रदेशाध्यक्षांकडून त्याबाबतची सूचना घेऊन तातडीने या निवडी करणे आवश्यक होते. तरीही नेत्यांमध्येच निरुत्साह दिसत असल्याने ही सर्व पदे रिक्त आहेत. पदांसाठी आता माणसेही पक्षाला शोधावी लागणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमवावे लागतील. कारण सध्या पदांसाठीची पक्षातील स्पर्धाही कमी झाली आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेसने टाकले राष्ट्रवादीला मागे
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांनी एकाचवेळी राजीनामा दिला होता. दिनकर पाटील यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तर मुन्ना कुरणे यांनी पदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केली होती. कॉँग्रेसने या रिक्त पदावर तातडीने पृथ्वीराज पाटील यांची निवड करून पक्षीय कामकाजाला सुरुवात केली. तुलनेने राष्ट्रवादीत पदांच्या नियुक्त्यांबाबत तत्परता दिसून येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
राष्ट्रवादीच्या वकील व डॉक्टर सेलच्या कार्यकारिणीही गठित झालेल्या नाहीत. त्यासाठीही माणसांचा शोध सुरू आहे. सांगली जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक पदही रिक्त आहे. अशोक स्वामी यांनीही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या जागेवर नवा निरीक्षकही नियुक्त करण्यात आलेला नाही.