वशिल्यातल्या ठेकेदाराच्या कोटकल्याणासाठी कमानीच्या पुलांचा अट्टाहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:31+5:302021-02-08T04:23:31+5:30

सांगली : बांधकाम क्षेत्रात नवनवी तंत्रे आणून गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या काळात सार्वजनिक बांधकामचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे. नाबार्डने ...

Arch bridges for the welfare of the contractor in Vashila | वशिल्यातल्या ठेकेदाराच्या कोटकल्याणासाठी कमानीच्या पुलांचा अट्टाहास

वशिल्यातल्या ठेकेदाराच्या कोटकल्याणासाठी कमानीच्या पुलांचा अट्टाहास

सांगली : बांधकाम क्षेत्रात नवनवी तंत्रे आणून गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या काळात सार्वजनिक बांधकामचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे. नाबार्डने मंजूर केलेल्या चार पुलांची कामे कमान पद्धतीने करण्याचे अनाकलनीय आदेश अधीक्षक अभियंता कार्यालयाने काढले आहेत. त्यांचे कालबाह्य डिझाइन कसे बनवायचे या चिंतेत अभियंते आहेत.

नाबार्डने जिल्ह्यात डझनभर पूलांसाठी निधी दिला आहे. त्यापैकी वड्डी-ढवळी, सांगली-कर्नाळ, मालगाव-मल्लेवाडी रस्ता आणि सोनी येथे ओढ्यांवरील पुलांसाठी सुमारे दहा कोटी रुपये मिळालेत. सार्वजनिक बांधकामच्या अभियंत्यांनी त्यांची डिझाइन्स व अंदाजपत्रके बनविली, तोपर्यंत अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून नवे फर्मान आले. सर्व पूल कमान पद्धतीने उभारण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे अभियंत्यांच्या डोकेदुखीत भर पडली.

कमान पद्धतीचे पूल कालबाह्य झाले आहेत. सर्व नवे पूल सिमेंटच्या खांबावर स्लॅब पद्धतीने बांधले जातात. ते टिकाऊ, तुलनेने कमी खर्चाचे, कमी देखभालीचे असल्याचे सिद्ध झाले आहे; त्यामुळे कमानीची पद्धती कालबाह्य झाली आहे. जिल्ह्यात सध्या कृष्णेसह सर्व नद्या व ओढ्यांवरचे पूल खांबांवरील स्लॅब पद्धतीचेच उभारले जात आहेत. मात्र अधिक्षक अभियंता कार्यालयाच्या फर्मानानंतर सिमेंटमधील कमानीच्या पुलाच्या डिझाइनची चिंता अभियंत्यांना लागून राहिली आहे, शिवाय त्यांची अंदाजपत्रकेही अजून तयार न झाल्याने कामे रखडण्याची चिन्हे आहेत.

चौकट

निवृत्तीच्या उंबरठ्यावर गल्ला ?

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कमानीच्या पुलांचे ठेकेदार तूर्त नाहीत. साताऱ्यात एक व पुण्यात काही ठेकेदार अशी कामे करतात. त्यापैकी एकाच्या कोटकल्याणासाठी कमानीच्या पुलाचे फर्मान निघाल्याची चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाममधील एक वरिष्ठ अधिकारी लवकरच निवृत्त होणार असून तत्पूर्वी पुलांच्या माध्यमातून गल्ला गोळा करण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे.

चौकट

कडेगावमध्ये बेत हाणून पाडला

कडेगाव तालुक्यातही नाबार्डमधून बरेच पूल मंजूर आहेत. तेदेखील कमान पद्धतीनेच उभारण्याचे फर्मान निघाले होते. पण तेथील ठेकेदारांनी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यापर्यंत विषय नेला. डॉ. कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावत नव्या पद्धतीनेच पूल उभारण्यास सांगितले. कंत्राटदारांच्या एकजुटीने अधिकाऱ्यांचे मनसुबे हाणून पाडले गेले.

चौकट

काय आहेत आक्षेप ?

सिमेंटमधील कमानीच्या पुलाचा अनुभव असणारे अधिकारी आणि ठेकेदार फारसे नाहीत. त्यांच्या टिकाऊपणाविषयीदेखील साशंकता आहे, शिवाय भविष्यात देखभाल दुरुस्तीही आव्हानात्मक आणि खर्चिक आहे. या स्थितीत त्यांचा अट्टाहास कशासाठी? असा प्रश्न आहे. खांबांवरील स्लॅबच्या पुलांची गुणवत्ता सिद्ध झालेली असताना त्यांना डावलण्यामागे काळेबेरे असल्याचीही चर्चा आहे.

-------------

Web Title: Arch bridges for the welfare of the contractor in Vashila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.