आटपाडी पोलिसांच्या कारभाराला चाप
By Admin | Updated: March 17, 2015 00:10 IST2015-03-16T23:34:16+5:302015-03-17T00:10:23+5:30
--लोकमतचा दणका

आटपाडी पोलिसांच्या कारभाराला चाप
अविनाश बाड - आटपाडी पोलिसांच्या भोंगळ कारभाराला आज (सोमवारी) जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्या विशेष पथकाने चाप लावला. तालुक्यात सुरु असलेला मटका आणि येथील पोलीस ठाण्यातील ‘कलेक्टरां’चा पर्दाफाश या पथकाने केला. पथकाने आज तालुकाभर छापे टाकले. खरसुंडीतील मटक्याच्या अड्ड्यावरून संशयितांसह तब्बल ५ हजार ४५२ रोख रक्कम जप्त केली. विशेष पथकामुळे आज दिवसभर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी प्रथमच गणवेशात असल्याचे तालुकावासीयांनी पाहिले.‘लोकमत’ने आजच्या (सोमवार दि. १६ मार्च) अंकात आटपाडी पोलीस ठाण्यातील अजब कारभाराबद्दल सडेतोड वृत्त प्रसिध्द केले. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेतली. त्याचे पडसाद आटपाडी पोलीस ठाण्यात दिवसभर दिसत होते.पोलीस ठाण्यातील फलकावर सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गणवेशात हजर राहावे, अशी सूचना लिहिण्यात आली. यासोबत प्रभारी अधिकारी यांनी हजेरी घ्यावी, अशीही सूचना लिहिण्यात आली होती. गोपनीय विभागातील कर्मचारी वगळता आज सर्व कर्मचारी गणवेशात होते.जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने दिवसभर अनेक ठिकाणी छापे टाकले; मात्र पथकाचा सुगावा लागल्याने अनेक ठिकाणी पथकाला यश मिळू शकले नाही, तर अवैध धंदेवाल्यांची आज दिवसभर पळता भुई थोडी झाली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खरसुंडी येथील निकम वस्ती रस्त्यावरील कल्याण, मुंबई मटका घेताना तानाजी काशिनाथ निकम (वय ६५, रा. चिंचाळे) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पथकाने जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली. या मटका बुकीचा मालक मधुकर पाटोळे (रा. खरसुंडी) याच्याविरुध्द पथकातील कर्मचारी अरुण पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
साहेब पुढे बसले!
आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे आज दिवसभर गणवेशात जीपच्या पुढील ‘सीट’वर बसले होते. आटपाडी पोलिसांनीही आटपाडी आणि दिघंची परिसरात रस्त्यावर इतरांना बाधा येईल, अशा लावलेल्या चार वाहनांवर कारवाई केली.