शिराळ्यातील डोंगरमाथ्यावरील कुंभ वन्यजिवांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:21+5:302021-04-25T04:26:21+5:30
बिळाशी : शिराळा तालुक्यात डोंगरमाथ्यावर असणारे नैसर्गिक पाण्याचे झरे पक्षी व वन्यप्राण्यांसाठी संजीवनी ठरत आहेत. ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची ...

शिराळ्यातील डोंगरमाथ्यावरील कुंभ वन्यजिवांचा आधार
बिळाशी : शिराळा तालुक्यात डोंगरमाथ्यावर असणारे नैसर्गिक पाण्याचे झरे पक्षी व वन्यप्राण्यांसाठी संजीवनी ठरत आहेत. ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची वानवा असताना चिंतेश्वर मंदिराजवळचे कुंभ व लाडोबाचा झरा पक्ष्यांची तहान भागवत आहे.
फेब्रुवारी ते मे अखेर प्रचंड उन्हाचा दाह सुरू आहे. पाण्याअभावी वानर, ससे, डुक्कर, भेकर, रानपक्षी तित्तर, लाव्हर, मोर, चिमणी यासारखे पक्षी पाण्यासाठी वणवण फिरत असतात. अनेकदा तहानलेल्या पक्ष्यांना योग्यवेळी पाणी न मिळाल्यामुळे तडफडून प्राण सोडावा लागतो; परंतु बिळाशी परिसरातील चिंतेश्वर मंदिराच्या पश्चिमेकडील कुंभांमध्ये बारमाही पाणी वाहत आहे. ऐन उन्हाळ्यातही तेथील पाणी वाहते आहे. या कुंभांचे नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुनर्जीवित केल्यास प्राण्यांना नैसर्गिकरीत्या पाणी मिळणार आहे.
लाडोबा मंदिराजवळ जाताना डाव्या बाजूला पिंपळाच्या खाली मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी वाहत असते. हे पाणी अतिशय उच्च प्रतीचे आहे. या परिसरात जाणारे गुराखी तसेच मेंढपाळ येथील पाणी बिनधास्तपणे पितात तसेच रात्रीच्या वेळी या पाणवठ्यावर इतर प्राणीही येत असल्याचे येथील नागरिक सांगतात.
चाैकट
पाण्याच्या साठ्याचा शोध घ्यावा
सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटामध्ये असे नैसर्गिक पाण्याचे स्रोत शोधून काढून ते पुनर्जीवित केल्यास रानपक्षी प्राणी यांना चांगले पाणी मिळून त्यांची तहान भागेल. त्याकरिता वनविभागाने पुढाकार घेऊन गावोगावी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील नैसर्गिक पाण्याच्या साठ्याचे शोध घेऊन त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे.