लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्र शासनाने सांगली जिल्ह्यासाठी ‘नीट’ परीक्षा केंद्र मंजूर केल्याने शिक्षण क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. या केंद्राचा फायदा सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.
राष्ट्रीय पात्रता चाचणी आणि प्रवेश परीक्षा केंद्र सांगलीत व्हावे म्हणून ॲड. अमित शिंदे व डॉ. विशाल मगदूम यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केलेला होता. एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी)च्या वतीने देशामध्ये दरवर्षी नीटच्या परीक्षा घेतल्या जातात. एमबीबीएस, बीडीएस सोबतच आयुष कोर्सेस, व्हेटर्नरीच्या संपूर्ण देशांतील १५ टक्के कोटा तसेच शासकीय, अनुदानित व खासगी महाविद्यालयातील बीपीटीएच, बीपीओ, बीएएसपीएल, बीएससी नर्सिंगच्या प्रवेशासाठीही नीट परीक्षा देणे आवश्यक आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये ८ इंजिनिअरिंग, ३ एमबीबीएस, २ बीडीएस, ३ बीएएमएस, ३ बीएचएमएस तसेच फार्मसी, आर्किटेक्चर महाविद्यालये आहेत. जिल्ह्यात १४८ महाविद्यालये असून सांगली जिल्ह्याच्या विद्यार्थांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परीक्षेस जावे लागत होते. यावर्षी जिल्ह्यातून दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेस बसतील, असा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, शिरोळ, इचलकरंजी या परिसरातील विद्यार्थ्यांना सांगलीचे केंद्र सोयीचे ठरणार आहे. त्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थीही सांगली केंद्राचा लाभ घेतील. अशा सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र सोयीचे ठरणार आहे. मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या नीटच्या परीक्षा केंद्रांच्या यादीत सांगलीचा उल्लेख करण्यात आला आहे.
चौकट
अमित शिंदे यांचा सत्कार
या निर्णयानंतर पालक व प्राध्यापकांच्या वतीने ॲड. अमित शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महालिंग हेगडे, जयंत जाधव, ॲड. अरूणा शिंदे, प्रा. योगेश पाटील, संभाजी पोळ, इंजि. किरण एरंडोले, प्रा. रोहित कुंभारकर उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, खासदार संजयकाका पाटील यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्याकडे पत्रव्यवहार केल्यामुळे हा निर्णय झाला.