सिव्हिलमधील सीटी स्कॅन यंत्र खरेदीला मान्यता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:26+5:302021-06-18T04:18:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्र खरेदीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन ...

सिव्हिलमधील सीटी स्कॅन यंत्र खरेदीला मान्यता द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्र खरेदीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी मान्यता दिली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन ही यंत्रसामुग्री खरेदी करावी. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना त्याचा लाभ होईल, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली.
आ. गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन सिव्हिलमधील विविध कामांबाबत चर्चा केली. सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकातील रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालय हे मोठे आधार आहे. या रुग्णालयात सीटी स्कॅनची व्यवस्था नसल्याने रुग्णांना खासगी सेंटरमध्ये सीटी स्कॅन करावे लागते. गोरगरीब रुग्णांना त्याचा खर्च अनेकदा परवडत नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयात सीटी स्कॅनची सुविधा देण्याची मागणी गाडगीळ यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ८ कोटी २२ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती.
या खरेदीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाची मान्यता आवश्यक होती. गाडगीळ यांनी मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले होते. त्यानंतर वैद्यकीय विभागानेही खरेदीला तांत्रिक मान्यता दिली. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. त्यासाठी गाडगीळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.