साडेतीन कोटींच्या रस्ते कामास मंजुरी
By Admin | Updated: August 24, 2014 23:16 IST2014-08-24T23:07:43+5:302014-08-24T23:16:55+5:30
इस्लामपूर पालिका सभा : सात रस्त्यांची कामे होणार

साडेतीन कोटींच्या रस्ते कामास मंजुरी
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेला शासनाकडून रस्ते विकासासाठी मिळालेल्या अनुदानातून करावयाच्या सात रस्त्यांच्या कामांना आज (रविवारी) झालेल्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष संजय कोरे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा पार पडली.
या सभेमध्ये केवळ रस्ते कामाचा विषय होता. ई निविदा पध्दतीने या रस्ते कामासाठी आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अंदाजपत्रकापेक्षा ११, ८ व ७ टक्के जादा दराच्या निविदा आल्या होत्या.सभागृहात अभियंता शाम खटावकर यांनी या निविदांची माहिती देतानाच युनिटी बिल्डर्स, कऱ्हाड यांनी ५ टक्के दराने काम करण्याची तयारी दर्शविल्याचे पत्र वाचून दाखवले.
त्यामुळे सभागृहाला अंधारात ठेवून प्रशासनाकडूनच सर्व सूत्रे हलविली जात असल्याबद्दल नगरसेवक खंडेराव जाधव, बी. ए. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. संजय कोरे यांनी, सभागृहात चर्चा न होता झालेली ही कार्यवाही म्हणजे निगोसिएशन समजायचे का? असा प्रश्न उपस्थित केला.
बी. ए. पाटील यांनी, ज्या ठेकेदाराला हे काम दिले जाणार आहे, त्यांची पात्रता, अनुभव आणि आर्थिक विवरणाची माहिती घ्यावी. तीनही ठेकेदारांशी चर्चा करुन जो कमी रकमेत काम करण्यास मान्यता देईल, त्याला हे काम द्यावे, अशी सूचना केली. (वार्ताहर)
पत्रवाचनानंतर सभागृह अवाक
इस्लामपूर शहरातील सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या सात रस्त्यांच्या कामासाठी कऱ्हाड (जि. सातारा) येथून तीन निविदा आल्या. त्यातील अंदाजपत्रकापेक्षा सात टक्के जादा दराने आलेली निविदा मंजूर करण्यापूर्वीच बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी हा ठेकेदार आणखी २ टक्के कमी दराने काम करण्यास तयार असल्याचे पत्र वाचून दाखवल्यावर अवघे सभागृहच
अवाक् झाले.