मिरज शासकीय रुग्णालयात २० हजार लीटर ऑक्सिजन प्लान्टला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:44+5:302021-08-22T04:29:44+5:30
मिरज : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत असलेल्या मिरज शासकीय कोविड रुग्णालयात २० हजार लीटर क्षमतेचा आणखी एक ऑक्सिजन प्लान्ट ...

मिरज शासकीय रुग्णालयात २० हजार लीटर ऑक्सिजन प्लान्टला मंजुरी
मिरज : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत असलेल्या मिरज शासकीय कोविड रुग्णालयात २० हजार लीटर क्षमतेचा आणखी एक ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. महिनाभरात या ऑक्सिजन प्लान्टची उभारणी झाल्यानंतर जिल्ह्यात एकूण ५१ हजार किलोलीटर ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार आहे. ३८५ बेडची क्षमता असलेल्या मिरज शासकीय रुग्णालयात सध्या २७० रुग्ण उपचार घेत असून रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु आहे. गेली दीड वर्षे मिरज सिव्हिलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पहिल्या लाटेत सर्वत्र कोरोना साथ सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयाचे शासकीय कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले. सिव्हिलमध्ये आतापर्यंत हजारो कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तीन महिन्यांपूर्वी ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झाल्याने ३८५ बेडची क्षमता असलेल्या शासकीय रुग्णालय प्रशासनाला धावपळ करावी लागली. १७० ऑक्सिजन बेड आहेत. त्यामुळे रुग्णालयात यापूर्वी ६ हजार किलोलीटर क्षमतेच्या तीन टाक्या असलेला ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आला आहे. सांगली शासकीय रुग्णालयात १३ हजार किलोलीटरचा एक ऑक्सिजन प्लान्ट आहे. या ऑक्सिजन प्लान्टमधून आत्तापर्यंत ३१ हजार किलोलीटरचा ऑक्सिजन पुरवठा सुरु होता. त्यात आता २० किलोलीटरने वाढ होऊन ५१ हजार किलोलीटर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. सध्या मिरज सिव्हिलमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. ३८५ रुग्ण क्षमता असलेल्या शासकीय रुग्णालयात सध्या २७० रुग्ण उपचार घेत आहेत. तर दैनंदिन दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही गेल्या चार महिन्यांत आता कमी होत आहे. यामुळे रुग्णालय कर्मचारी व प्रशासनावरील कामाचा ताण कमी होत आहे.