आरगच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आरोग्य मंत्र्यांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:58+5:302021-06-10T04:18:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क म्हैसाळ : आरग (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या १,३८२वरून ६३पर्यंत कमी झाली ...

आरगच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आरोग्य मंत्र्यांकडून कौतुक
लाेकमत न्यूज नेटवर्क
म्हैसाळ : आरग (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या १,३८२वरून ६३पर्यंत कमी झाली आहे. या यशाबद्दल आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी थेट फाेन करुन आरगचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिकोडीकर यांचे अभिनंदन केले.
आरग प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरग, बेडग, लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी अशा सहा गावांचा समावेश होतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरग प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या आरग व बेडग या दोन गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. या दोन गावांमध्येच एक हजारावर रुग्ण नाेंदले गेले हाेते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर माेठा ताण होता. लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजनच्या साेयीसह कोविड सेंटर सुरू केले. या कोविड सेंटरचा फायदा अनेकांना झाला. जवळपास ३०० रूग्णांना ऑक्सिजन बेडची गरज पडली. आता फक्त बारा रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
ग्रामीण भागामध्ये एचआरसीटी स्कोर दहा-बारापेक्षा जास्त दिसल्यास लोक भीतीपोटी शहरातील शासकीय दवाखाने किंवा खासगी दवाखान्यांमध्ये दाखल होतात. पण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिकोडीकर यांनी पंधरा ते अठरापर्यंत स्काेर असलेल्या अनेक रुग्णांना या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार करून काेराेनामुक्त केले आहे. या संपूर्ण कामाचा आढावा घेत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी डॉ. नितीन चिकोडीकर व त्यांच्या पथकाचे फोन करून अभिनंदन केले.
कोट
आरग प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत आरग, बेडग, लिंगणूर, खटाव, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी या सहा गावांचा समावेश होतो. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत आरग व बेडग या गावांमध्ये जवळपास एक हजार रूग्ण बाधित होते. काेराेना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच त्यांच्या घरातील सर्वांना प्राथमिक औषधोपचार सुरू केल्याने रूग्णसंख्या कमी झाली. आता केवळ ६३ रुग्ण उपचाराखाली आहेत.
- डॉ. नितीन चिकोडीकर
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरग