अखंडित स्वच्छता उपक्रमाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:03+5:302021-05-03T04:21:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरात सलग तीन वर्षे अखंडितपणे स्वच्छता अभियान राबविण्याचा उपक्रम निर्धार फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. ...

अखंडित स्वच्छता उपक्रमाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरात सलग तीन वर्षे अखंडितपणे स्वच्छता अभियान राबविण्याचा उपक्रम निर्धार फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. युवा संघटनेच्या माध्यमातून भूखंड, रस्ते, चौक स्वच्छ करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी यावेळी काढले.
सांगली शहर स्वच्छतेचा निर्धार करून १ मे २०१८ पासून राकेश दड्डणावर व निर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून सांगली शहरात स्वच्छता अभियान सुरू आहे. शनिवारी १ मे महाराष्ट्रदिनी अभियानाच्या १,०९६ व्या दिवशी विश्रामबाग चौकातील महानगरपालिकेच्या अस्वच्छ खुल्या भूखंडाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी ४ ते ५ टन कचरा, राडारोडा गोळा करण्यात आला. पालकमंत्री जयंत पाटील यांनी याठिकाणी येऊन अभियानाची पाहणी केली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, प्रा. पद्माकर जगदाळे आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, सांगलीमध्ये निर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून राकेश दड्डणावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छतेची मोहीम अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. आज महानगरपालिकेचा अस्वच्छ खुला भूखंड स्वच्छ करण्याचे काम त्यांनी केले. राकेशसारख्या युवकाच्या नेतृत्वाखाली युवक व युवतींनी एकत्र येऊन फार मोठी मदत सांगली शहरातील नागरिकांना केलेली आहे.
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की, डिजिटल व फॅशनच्या युगात आजकालची राकेशसारखी युवा पिढी स्वच्छतेचे करत असलेले काम खरोखर कौतुकास्पद आहे.
यावेळी संजय बजाज, नितीन चौगुले, राहुल पवार, सतीश कट्टीमणी, लखन सादिगले, दीपक कोळी, प्रथमेश खिलारे, अमर बनसोडे, आकाश डुबल, अजिंक्य रोपळकर, सचिन ठाणेकर, राहुल पाटील, अनिरुद्ध कुंभार, निवृत्ती शिंदे, भारत जाधव आदींनी श्रमदानात सहभाग नोंदवला.