महापुराच्या अभ्यासासाठी समिती नेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST2021-07-27T04:27:35+5:302021-07-27T04:27:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली शहराला तीनदा महापुराचा मोठा फटका बसला आहे. महापुराच्या अभ्यासासाठी समिती नियुक्त करून त्यावर ...

महापुराच्या अभ्यासासाठी समिती नेमा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली शहराला तीनदा महापुराचा मोठा फटका बसला आहे. महापुराच्या अभ्यासासाठी समिती नियुक्त करून त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आले. यावर पवार यांनी २०१९ मध्ये प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासगट स्थापन केला होता. त्याचा अहवालाचा अभ्यास करून नियोजन करण्याची ग्वाही दिली.
पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री पवार सांगलीत आले होते. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांना प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, नागरिकांचे पुनर्वसन करावे, शेतकऱ्यांना एक लाखाचे अनुदान द्यावे, सांगलीत कृष्णा नदीने ४५ फुटांची पातळी गाठल्यानंतर पाणीपुरवठा जॅकवेल बुडते. जॅकवेलची उंची ६५ फुटापर्यंत करावी, पुरामुळे शहराचा संपर्क तुटतो, त्यासाठी रस्त्यांची उंची वाढवावी, हेलिपोर्टची निर्मिती करावी,
आदी मागण्या करण्यात आल्या. यावर पवार म्हणाले की, कोयना धरण क्षेत्रात ३२ इंच पाऊस झाला. त्यामुळे पुराचा फटका नागरिकांना बसला आहे. २०१९ च्या पुरावेळी प्रवीण परदेशी यांची समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल शासनाकडे आला आहे. त्यानुसार पूरग्रस्त भागात उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
यावेळी सतीश साखळकर, अमर पडळकर, आश्रफ वांकर, प्रशांत भोसले, महेश खराडे, शंभुराज काटकर, लालू मिस्त्री, तोहीद शेख, अविनाश जाधव, अनिल शेटे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.