रेलच्या आरक्षित तिकिटांवर प्रिमियम लागू
By Admin | Updated: November 11, 2014 00:03 IST2014-11-10T22:07:37+5:302014-11-11T00:03:12+5:30
प्रवास महागला : वाढत्या तिकीट दराचा रेल्वे प्रवाशांना फटका; नव्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी

रेलच्या आरक्षित तिकिटांवर प्रिमियम लागू
सदानंद औंधे - मिरज -रेल्वे अर्थसंकल्पातील दरवाढ कमी करण्यात आली; मात्र रेल्वेची आरक्षित तात्काळ तिकिटांची प्रिमियम दराने विक्री सुरू करण्यात आल्याने तिकिटांची रक्कम दुप्पट ते तिप्पट झाली आहे. मिरजेतून जाणाऱ्या गोवा-निजामुद्दीन, कोल्हापूर-निजामुद्दीन, बेंगलोर-अजमेर, बेंगलोर-जोधपूर या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसला प्रिमियम तिकीट दर लागू करण्यात आल्याने, प्रवाशांना हजारो रुपये जादा मोजावे लागत आहेत.
गर्दीच्या हंगामात आरक्षित रेल्वे तिकिटांना मोठी मागणी असताना काळ्या बाजारात मागणीप्रमाणे तिकिटाचा दर वाढत जातो. आता याच पध्दतीने रेल्वेने जादा मागणी असलेल्या तिकिटांना प्रिमियम लागू करून आरक्षित, तात्काळ तिकिटांची विक्री सुरू केल्याने तिकिटांचे दर विमान तिकिटांच्या जवळपास पोहोचले आहेत. गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचा मिरजेतून निजामुद्दीनपर्यंत द्वितीय श्रेणीचा तात्काळ तिकिटाचा दर ९०० रुपये आहे. मात्र प्रिमियम दराने निजामुद्दीनसाठी दोन हजार रुपये आकारणी सुरू आहे. २२०० रुपयांना मिळणाऱ्या तृतीय श्रेणी वातानुकूलित दर्जाच्या तिकिटाचा दर साडेतीन हजारांपर्यंत जात आहे.
कोल्हापूर-निजामुद्दीन, जोधपूर, अजमेर या एक्स्प्रेसच्या तात्काळ तिकिटांनाही दुप्पट, तिप्पट पैसे द्यावे लागत आहेत. रेल्वेच्या प्रिमियम तिकीट दरामुळे तात्काळ तिकिटासाठी होणारी गर्दी रोडावल्याचे चित्र आहे. तीन महिने अगोदर मिळणारे आरक्षित तिकीट परवडणारे असल्याने आता गरज असणारे प्रवासीच तात्काळ तिकीट काढण्याचे धाडस करीत आहेत. मिरजेत गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसला १९५ तात्काळ तिकिटांचा कोटा आहे. तसेच कोल्हापूर निजामुद्दीन एक्स्प्रेसचा १५० तात्काळ तिकिटांचा कोटा आहे. या दोन्ही कोट्यातील अर्धी तिकिटे प्रिमियम दराने विकण्यात येत आहेत. अजमेर, जोधपूर या एक्स्प्रेसना मिरजेसाठी कोटाच नाही. कोल्हापूर-तिरूपती हरिप्रिया, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोल्हापूर ते मुंबई महालक्ष्मी, सह्याद्री, कोयना या, प्रवाशांची मोठी गर्दी असलेल्या रेल्वेगाड्यांसाठी अद्याप प्रिमियम तिकीट दर लागू नाही. यांचाही प्रिमियम तिकीट दरात समावेश केल्यास रेल्वे प्रवास महागडा होणार आहे.
एजंटांचेही झाले वांदे
तिकीट एजंट व रेल्वे कर्मचारी यापूर्वी संगनमताने तात्काळ तिकिटांचा काळाबाजार करून मोठ्या प्रमाणात कमाई करीत होते. मात्र आता मागणीप्रमाणे वाढता दर लागू करून रेल्वे प्रशासनाने तिकीट एजंटांच्या काळ्याबाजाराला शह दिला आहे. तिकिटाच्या किमतीएवढीच जादा रक्कम घेणाऱ्या तिकीट एजंटांनाही प्रिमियम किमतीत तिकिटे काढणे न परवडणारे ठरले आहे.
हंगामी दोन एक्स्प्रेस नियमित शक्य
केंद्रात सुरुवातीला कर्नाटकचे रेल्वेमंत्री असल्याने अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा न करता कर्नाटकातून नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचे नियोजन झाले. हुबळी-कुर्ला साप्ताहिक एक्स्प्रेस दि. १७ पासून नियमित होणार आहे. यामुळे मिरजेतून मुंबईला जाण्यासाठी दररोज महालक्ष्मी व चालुक्य एक्स्प्रेससोबत रात्री ९.१५ वाजता एका जादा एक्स्प्रेसची सोय होणार आहे. मिरजेतून जाणाऱ्या हुबळी-पटना ही आठवड्यातून तीनवेळा बुधवार, शुक्रवार, सोमवारी सुटणारी हंगामी एक्स्प्रेस व यशवंतपूर-बिकानेर ही साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू होणार आहे. दोन्ही एक्स्प्रेस प्रिमियम व हंगामी असून, काही काळानंतर नियमित होण्याची शक्यता रेल अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आता महाराष्ट्राचे रेलमंत्री झाल्याने नव्या गाड्या सुरू करण्याबरोबर वाढलेल्या आरक्षित तिकिटांचा दर कमी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.