महापौरपदासाठी सूर्यवंशी, साखळकर, बागवान यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST2021-02-19T04:15:38+5:302021-02-19T04:15:38+5:30

सांगली : भाजपच्या अंतर्गत कुरबुरीमुळे महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक रंगतदार बनली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ...

Applications of Suryavanshi, Sakhalkar, Bagwan for the post of Mayor | महापौरपदासाठी सूर्यवंशी, साखळकर, बागवान यांचे अर्ज

महापौरपदासाठी सूर्यवंशी, साखळकर, बागवान यांचे अर्ज

सांगली : भाजपच्या अंतर्गत कुरबुरीमुळे महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक रंगतदार बनली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महापौरपदासाठी चार उमेदवारांनी नऊ, तर उपमहापौर पदासाठी सहा अर्ज दाखल झाले. भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी, तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, तर काँग्रेस व राष्ट्रवादीत शेवटच्या क्षणापर्यंत ताळमेळ न झाल्याने दोन्ही पक्षांनी अर्ज दाखल केले आहेत.

महापौर, उपमहापौर पदांची निवडणूक २३ फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाईन पद्धतीने होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी शेवटची मुदत होती. या मुदतीत महापौरपदासाठी भाजपचे धीरज सूर्यवंशी, काँग्रेसकडून उत्तम साखळकर, तर राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी या चारजणांनी अर्ज दाखल केले, तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या गजानन मगदूम यांच्यासह काँग्रेसकडून उमेश पाटील, तर राष्ट्रवादीकडून सविता मोहिते व स्वाती पारधी यांचे अर्ज दाखल झाले.

महापौरपदासाठी भाजपमध्ये धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, अजिंक्य पाटील व युवराज बावडेकर यांच्यात मोठी चुरस होती. पाटील व बावडेकर यांची नावे बुधवारी मागे पडली होती. सूर्यवंशी व आवटी यांच्या नावावर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. अखेर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आपले वजन सूर्यवंशी यांच्या पारड्यात टाकले. गुरुवारी सकाळी आमराई क्लब येथे भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, भाजपचे नेते शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, आदी उपस्थित होते. बैठकीत धीरज सूर्यवंशी व गजानन मगदूम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

काँग्रेस-राष्ट्रवादीत शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. त्यातच पालकमंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्यासोबत चर्चा अर्धवट राहिली. सकाळी काँग्रेसचे नगरसेवक जयश्री पाटील यांच्या विजय बंगल्यावर एकवटले होते. जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय न झाल्याने अखेर दोन्ही काँग्रेसने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापौर पदासाठी उत्तम साखळकर, तर राष्ट्रवादीकडून मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून उमेश पाटील, राष्ट्रवादीकडून सविता मोहिते व स्वाती पारधी यांनी अर्ज दाखल केले.

चौकट

अडीच वर्षांत तीन महापौर, उपमहापौर

सत्ताधारी भाजपने पुढील अडीच वर्षांत तीन महापौर व तीन उपमहापौर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक महापौर-उपमहापौरांना दहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सूर्यवंशी यांच्यानंतर निरंजन आवटी व शेवटच्या दहा महिन्यांत अजिंक्य पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उपमहापौर पदाबाबत मात्र ज्या त्या वेळी निर्णय घेतले जातील, असे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी सांगितले. गटनेते पदाबाबतही हाच निकष लावण्यात आला असून, आणखी दोघांना गटनेतेपदाची संधी दिली जाणार आहे.

फोटो १८ शीतल ०२ व ०३

===Photopath===

180221\img-20210218-wa0010.jpg

===Caption===

सांगली महापालिकेच्या महापौरपदासाठी धीरज सुर्यवंशी यांनी अर्ज दाखल केला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, दिनकर पाटील, सुरेश आवटी, शेखर इनामदार उपस्थित होते.

Web Title: Applications of Suryavanshi, Sakhalkar, Bagwan for the post of Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.