आटपाडी तहसीलदारांचे अपील फेटाळले

By Admin | Updated: August 5, 2014 00:14 IST2014-08-04T23:46:26+5:302014-08-05T00:14:58+5:30

ठेकेदारावरील कारवाई : पाचजणांवर गुन्हा शक्य

Appeal rejected by Atpadi Tehsildar | आटपाडी तहसीलदारांचे अपील फेटाळले

आटपाडी तहसीलदारांचे अपील फेटाळले

आटपाडी : वाळू ठेकेदाराकडे कागदपत्रे असूनही तीन लाखांचा दंड केल्याप्रकरणी आटपाडीचे तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांचे अपील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळले. आटपाडी न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीची स्थगितीही उठविली आहे. त्यामुळे आता तहसीलदार कट्यारे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
फिर्यादी बापू हिराप्पा कर्चे (रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यावतीने काम पाहणाऱ्या अ‍ॅड. ज्योत्स्ना विजय वाळूजकर यांनी सांगितले की, कर्चे यांचा वाळू वाहतूक करण्याचा व्यवसाय
आहे. शासनाच्या अधिकृत वाळू ठेकेदाराकडून वाळूची वाहतूक करीत असताना दि. २० नोव्हेंबर २०१३ रोजी खरसुंडी (ता. आटपाडी) येथे तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी वाहने अडविली. ही वाहने जबरदस्तीने खरसुंडी पोलीस चौकीच्या आवारात नेऊन लावण्यात आली. वाहनचालकांनी वाळू वाहतुकीच्या पावत्या दाखविल्या. तरीही प्रत्येक वाहनामागे १ लाख असे एकूण ३ लाख रुपये वाहने सोडण्यासाठी मागितल्याचा आरोप केला आहे.
याप्रकरणी कर्चे यांनी आटपाडी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने तहसीलदार जोगेंद्र कट्यारे, मंडल अधिकारी एस. एस. जमादार (खरसुंडी), झरेचे तलाठी व्ही. आर. जाधव, घाणंदचे कोतवाल संजय सोपान माने आणि खरसुंडीचे कोतवाल नवनाथ शिवाजी डमकले यांच्याविरुद्ध आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल करून चौकशीचा आदेश दिला होता. या आदेशाला तहसीलदार कट्यारे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. आदेशाला स्थगितीही मिळाली होती. (वार्ताहर)

Web Title: Appeal rejected by Atpadi Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.