अंधांच्या संगणक शिक्षणासाठी दानशुरांना साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST2021-02-09T04:28:40+5:302021-02-09T04:28:40+5:30
सांगली : अंध तरुणांना संगणकाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत, यासाठी काही अंध लोकांनी मिळूनच मिरजेतील अंध, अपंग ...

अंधांच्या संगणक शिक्षणासाठी दानशुरांना साद
सांगली : अंध तरुणांना संगणकाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत, यासाठी काही अंध लोकांनी मिळूनच मिरजेतील अंध, अपंग सेवा संस्थेच्या माध्यमातून एक उपक्रम हाती घेतला आहे. समाजातील दानशुरांनी त्यांच्याकडील विनावापर पडून असलेले चालू स्थितीतील संगणक दान करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेकांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे.
अंध, अपंग सेवाभावी संस्था ही अंधांच्या सर्वांगीण विकासाकरिता कार्य करीत आहे. अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अंध विद्यार्थ्यांनाकरिता संगणक प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नसल्याने संस्थेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात अंध विद्यार्थ्यांना सोमवार ते शनिवार ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार असून, रविवारी त्यांना एकत्रित करून प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण विनामूल्य स्वरूपाचे आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने आहे. या प्रशिक्षणाकरिता मार्गदर्शक म्हणून स्वतः अंध असलेले पुणे अंध शाळेचे संगणक मार्गदर्शक तेजस बेंद्रे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या घरी संगणक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याकरिता अनेक संगणकांची आवश्यकता असून, ज्यांच्याकडे वापरात नसलेले संगणक असतील त्यांनी ते संस्थेने आखलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमास देऊन अंधांच्या विकासकामी अनमोल सहकार्य करावे. या कार्यात मदतीचा हातभार लागल्याने अंध विद्यार्थ्यांच्या विकासात भर पडेल, असे आवाहन यशवंत जाधव यांनी केले आहे.
चौकट
दानशुरांना आवाहन
उपक्रमास लोकांनी प्रतिसाद देत काही संगणक दिले आहेत. मात्र, आणखी संगणकांची गरज लागणार आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, अशा लोकांनी अंधांच्या या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.