बँक हिताच्या निर्णयाबरोबरच कायद्याचे भान हवे
By Admin | Updated: June 3, 2015 23:37 IST2015-06-03T23:00:51+5:302015-06-03T23:37:52+5:30
जयंत पाटील : जिल्हा मध्यवर्ती बँकेत आढावा बैठक; मोबाईल व्हॅनची पाहणी

बँक हिताच्या निर्णयाबरोबरच कायद्याचे भान हवे
सांगली : जिल्हा बँकेच्या प्रगतीच्यादृष्टीने निर्णय घेत असताना कायद्याचे भानही ठेवले पाहिजे, असे मत आ. जयंत पाटील यांनी बुधवारी बँकेच्या आढावा बैठकीत व्यक्त केले. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून विविध योजना व बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. मध्यवर्ती बँकेत दुपारी जयंत पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतानाच त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेतला. अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, उपाध्यक्ष संग्राम देशमुख उपस्थित होते. ते म्हणाले की, नव्याने काही योजना किंवा धोरण आखताना शेतकरी व बँक हिताचा विचार असावा. लोकांनी विश्वासाने बँकेची सत्ता आपल्याकडे सोपविली आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत कारभार झाला पाहिजे. ही बँक आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम झाली पाहिजे. राज्यातील आदर्श जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून नावाजली जावी, यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासकांच्या कालावधीतील काही चांगले निर्णय पुढे चालू ठेवताना, आणखी काही नव्या योजना राबविता येतील का, याचा विचार केला पाहिजे. या सर्व गोष्टी करताना कायद्याच्या चाकोरीतच काम केले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी दिली. बँकेच्या मोबाईल व्हॅनची पाहणीही जयंत पाटील यांनी केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्हॅनमधील सर्व सुविधांची माहिती दिल्यानंतर, पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी संजय बजाज, मनोज भिसे उपस्थित होते. (प्रतिनिधी)