ऐन दिवाळीत रिक्षांवर कारवाईचा बडगा!

By Admin | Updated: November 1, 2015 23:54 IST2015-11-01T23:54:34+5:302015-11-01T23:54:34+5:30

प्रचंड नाराजी : रस्त्यावरून रिक्षा गायब; दंडाची रक्कम भरणे अशक्य

Anu Diwali rack to take action! | ऐन दिवाळीत रिक्षांवर कारवाईचा बडगा!

ऐन दिवाळीत रिक्षांवर कारवाईचा बडगा!

सचिन लाड ल्ल सांगली
नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध गेल्या चार दिवसांपासून आरटीओ कार्यालयाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पण ऐन दिवाळीत कारवाई सुरू केल्याने चालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कारवाईपोटी सात ते आठ हजार रुपये दंड होत आहे. एवढा दंड भरणे चालकांना परवडत नसल्याने त्यांनी रिक्षा फिरविणे बंद केले आहे. शहरातील अनेक थांब्यांवर दररोज २० ते २५ रिक्षा लागायच्या. मात्र कारवाईच्या भीतीने पाच ते सातच रिक्षा लागत आहे. दिवाळीचा सण असल्याने आरटीओंनी ही कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी होत आहे.
मुदत ओलांडून गेलेले जिल्ह्यात अडीच हजार परवाने आहेत. हे परवाने नूतनीकरण करण्यासाठी परिवहन आयुक्तांनी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पण तरीही रिक्षाचालक नूतनीकरणास तयार नाहीत. त्यामुळे हे परवाने रद्द होत असल्याने आरटीओ कार्यालयाने सरसकट रिक्षाची तपासणी सुरूकेली आहे. परवाने नूतनीकरणाच्या अनुषंगाने तपासणी करायची होती. परंतु यामध्ये सर्वच रिक्षाचालक भरडले जात आहेत. गेल्या चार दिवसांत तब्बल सव्वाशे रिक्षांवर कारवाई केली. यातील पन्नास रिक्षा जप्त केल्या आहेत. सणासुदीच्या काळात या रिक्षा बाहेर काढणे अशक्य आहे. दंडाची रक्कम दहा हजाराच्या घरात जात आहे. सण साजरा करण्यास १५ ते १६ तास व्यवसाय करून पैसे मिळविण्याची धडपड सुरू असताना अचानक ही कारवाई सुरू झाल्याने रिक्षाचालक मेटाकुटीस आला असल्याचे चित्र आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय यापूर्वीच आर्थिक संकटात सापडला आहे. दिवसभरात शंभर-दोनशे रुपये हजेरी पाडणे मुश्किल बनले आहे.
संघटना आरटीओंना आज भेटणार
आरटीओंनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक कृती समिती रिक्षा संघटनेची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत कारवाईस आमचा विरोध नाही. पण सणासुदीच्या काळात ही कारवाई बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात सोमवारी आरटीओ दशरथ वाघुले यांना भेटून कारवाई थांबविण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस जिल्हाध्यक्ष गजानन बाबर, शहर अध्यक्ष रामभाऊ पाटील, फिरोज मुल्ला, शेखर शिंदे, राजू रसाळ, बबलू पाटील, नईम हकीम, प्रशांत सरडे, दीपक दळवी, सलीम ठाकूर आदी उपस्थित होते.
दंडाची रक्कम भरण्यास रिक्षा चालकांकडे पैसे नाहीत. सावकार अथवा भिशीमधून त्यांना पैसे काढावे लागत आहेत. एकीकडे कारवाई होत आहे. दुसरीकडे रिक्षा बंद ठेवावी लागत आहे. शिवाय दंडाच्या रकमेसाठी पैशाची जुळणी करण्यास भटकावे लागत आहे.
- रामभाऊ पाटील, शहर अध्यक्ष, प्रवासी वाहतूक कृती समिती

Web Title: Anu Diwali rack to take action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.