सत्ताधारी-विरोधकांत रंगला कलगीतुरा
By Admin | Updated: August 26, 2015 23:09 IST2015-08-26T23:09:35+5:302015-08-26T23:09:35+5:30
इस्लामपूर नगरपालिका : विरोधकांनी १४ हजारात खोके द्यावे : शहाजी पाटील

सत्ताधारी-विरोधकांत रंगला कलगीतुरा
अशोक पाटील- इस्लामपूरशहरातील जुनी खोकी काढून चार बाय पाच फूट आकाराची नवीन खोकी बसविण्यासाठी इस्लामपूर पालिका २२ हजार रुपये आकारत आहे. याविरोधात विरोधी पक्षनेते विजय कुंभार आणि शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी आवाज उठवला आहे. पालिकेने जादा दर लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक शहाजी पाटील यांनी, विरोधकांनी १४ हजारात खोकी उपलब्ध करून द्यावीत, असा पलटवार केला आहे.
शहरातील बसस्थानक परिसर आणि जुना बहे नाका येथे पालिकेच्यावतीने जुनी आणि वेगवेगळ्या आकाराची असलेली खोकी काढून तेथे चार बाय पाच फूट आकाराची खोकी बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे बाजारादिवशी होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु विरोधकांनी मात्र ही खोकी जास्त दराने दिल्याचा व कोणताही ठराव न करता बेकायदेशीरपणे ही खोकी बसविण्याचा उद्योग सुरू केल्याचा आरोप केला आहे.
विजय कुंभार आणि आनंदराव पवार या विरोधकांनी, ही खोकी दहा ते १४ हजारात मिळत असून, पालिकेने जादा पैसे घेऊन ते खिशात घातल्याचा आरोप केला आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले की, पूर्वीची लाकडी, पत्र्याची खोकी काढून चांगल्या दर्जाची पत्र्याची खोकी देण्यात आली आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. विरोधक विजय कुंभार यांनी, सत्ताधाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक कामात चुका काढण्याचा उद्योग सुरू केला आहे. पालिकेची अनेक विकासकामे व अंतर्गत कामांबाबात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप एकाही तक्रारीची तड लागलेली नाही. असे उद्योग कुंभार यांनी बंद करावेत. आम्ही शहराचा विकास करण्यासाठी खंबीर आहोत. आनंदराव पवार यांनी, ही खोकी १० हजार रुपयांना मिळतात, असा आरोप केला आहे. त्यामुळे या दोघांनाही माझे खुले आव्हान आहे. १० ते १४ हजारात खोके मिळत असेल, तर शहरातील सर्व खोक्यांचे पैसे मी देतो, ही खोकी त्यांनी बसवून दाखवावीत!
नवीन खोकी बसविण्यासंदर्भात पालिकेच्या सभेत ठराव करण्यात आला आहे, परंतु सभेला अनुपस्थित राहणाऱ्या विरोधकांना याची माहिती कशी असणार?, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खोकी बसविण्यावरून कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.
वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत
इस्लामपूर बसस्थानक परिसर आणि जुना बहे नाका येथे पालिकेच्यावतीने जुनी आणि वेगवेगळ्या आकाराची असलेली खोकी काढून तेथे चार बाय पाच फूट आकाराची खोकी बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे बाजारादिवशी होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. विरोधकांनी ठराव न करता बेकायदेशीरपणे ही खोकी बसविण्याचा उद्योग सुरू के
ल्याचा आरोप केला आहे.
विरोधी पक्षनेते आता शहरातील कोणत्याही विकास कामावर मत व्यक्त करू लागले आहेत. ज्याप्रमाणे आम्ही हिमतीवर जलदगतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे कामही पूर्ण करणार आहे. या कामांमध्ये विरोधकांचे कसलेही योगदान नसून, त्यांनी कोल्हेकुई बंद करावी.
- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद