अतिक्रमणविरोधी मोहिमेला ‘ब्रेक’

By Admin | Updated: January 17, 2016 00:35 IST2016-01-17T00:11:01+5:302016-01-17T00:35:31+5:30

महापालिका : आयुक्तांच्या हाती मोहिमेचे भवितव्य

Anti-encroachment campaign 'break' | अतिक्रमणविरोधी मोहिमेला ‘ब्रेक’

अतिक्रमणविरोधी मोहिमेला ‘ब्रेक’

सांगली : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला शनिवारी ‘ब्रेक’ देण्यात आला. सोमवारपासून पुन्हा कारवाईसाठी नियोजन करण्यात आल्याचे अधिकारी सांगत असले तरी, आता आयुक्त अजिज कारचे परतल्याने त्यांच्या हातीच मोहिमेचे भवितव्य असल्याचे दिसत आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली अतिक्रमणविरोधी मोहीम प्रभारी कालावधित जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सुरू केली. अनधिकृत बांधकामे, खोकी, झोपड्या अशा सर्वच गोष्टींवर त्यांनी कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून कारवाईचा धडाका सुरू होता. शनिवारी महापालिका सुरू असली तरी, कारवाई होऊ शकली नाही. जिल्हाधिकारी गायकवाड यांच्याकडून आयुक्तपदाचा कार्यभार पुन्हा अजिज कारचे यांच्याकडे आला आहे. त्यामुळे कारवाई सुरू राहणार की बंद पडणार, याबाबतची चर्चा सोमवारी महापालिकेत रंगली होती.
सांगली, मिरजेतील अनेक भागात अजून ही मोहीम राबविण्याची गरज आहे. शहरांना गेल्या पंधरवड्यात लागलेली शिस्त मोहीम बंद पडल्याने पुन्हा बिघडू शकते. त्यामुळे आयुक्त कारचे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कारवाईमुळे सांगली, मिरजेतील अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी व नागरिकांचे धाबे दणाणले होते. कारवाई बंद व्हावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. यामध्ये काही नगरसेवकांचाही समावेश आहे. मतांच्या राजकारणासाठी नगरसेवक व काही राजकीय कार्यकर्त्यांचा अशा मोहिमांना नेहमीच विरोध असतो. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कोणत्याही गोष्टीला न जुमानता कारवाई चालू ठेवली.
आयुक्तांच्या हजेरीत आता नेमके काय होणार, यावर मोहिमेचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)
आयुक्त आले : तीन तासात परतले
आयुक्त अजिज कारचे यांनी शनिवारी सकाळी वेळेत हजेरी लावली. काही वेळ ते कार्यालयात बसले. अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तीन तासानंतर परत गेले. सोमवारपासून महापालिका सेवेत ते रुजू होणार आहेत. प्रदीर्घ रजेनंतर त्यांनी पदभार पुन्हा हाती घेतल्याने त्यांच्या पुढील भूमिकेबाबत नगरसेवक, अधिकाऱ्यांना उत्सुकता लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मोहिमेला ते बळ देणार की, त्यांच्या पद्धतीनुसार ते काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Anti-encroachment campaign 'break'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.