आणखी एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By Admin | Updated: October 1, 2015 23:12 IST2015-10-01T23:12:14+5:302015-10-01T23:12:14+5:30
आठ नवे संशयित : कुपवाडला २४ तासात दोन बळी; घबराटीचे वातावरण

आणखी एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
सांगली : कुपवाड येथील गोकुळा मारुती चौगुले (वय ४०) या ‘स्वाइन फ्लू’संशयित महिलेचा मृत्यू होऊन २४ तासांचा कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत, लागण झालेल्या आणखी एका रुग्णाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. आकाराम तुकाराम थोरात (५८, रा. वसंतदादा सूतगिरणीजवळ, कुपवाड) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, जिल्ह्यात आणखी आठ नवे संशयित आढळून आले आहेत.
आकाराम थोरात यांना महिन्यापासून ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास सुरु होता. त्यांनी कुपवाड परिसरातील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरु ठेवले होते. पण त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांना स्वाइनफ्लूची लागण झाली असावी, असा संशय उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांना २६ सप्टेंबरला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. तपासणीचा अहवाल २९ सप्टेंबरला रुग्णालयास प्राप्त झाला.
यामध्ये त्यांना लागण झाल्याचे म्हटले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू ठेवले होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कुपवाडमध्ये स्वाइनने २४ तासात दोघांचा बळी गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगली, मिरज, कुपवाड, इस्लामपूर, पलूस, वाळवा परिसरात आणखी आठ नवीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
या रुग्णांवर सांगली, मिरज व इस्लामपुरात उपचार सुरु आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालाची प्रतीक्षा न करता औषधोपचार सुरू ठेवले आहेत. येत्या एक-दोन दिवसात त्यांचे अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती स्वाइन फ्लू कक्ष अधिकारी सदाशिव व्हण्णणावर यांनी दिली. (प्रतिनिधी)
बळींची संख्या वाढली
गेल्या नऊ महिन्यात जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ७० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १९ रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे, तर ५० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. कुपवाडच्या मृत झालेल्या गोकुळा चौगुले या संशयित महिलेचा तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. गेल्या आठवडाभरात दररोज एका-दोघांचा मृत्यू झाल्याने, स्वाइनचा जिल्ह्यात वेगाने फैलाव होत असल्याचे चित्र आहे.
महिलेला लागण
गुरुवारी रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. भवानीनगर येथील पार्वती मोहिते यांचा दोनच दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ रेठरेहरणाक्ष येथेही स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागामार्फत भवानीनगर व बिचूद येथे सर्वेक्षण सुरु आहे.