आणखी सहकारी बँकेचे ठेवीदार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:24 IST2021-04-06T04:24:54+5:302021-04-06T04:24:54+5:30

सांगली : इचलकरंजी येथील एका सहकारी बँकेच्या सांगलीतील टिंबर एरियातील शाखेने ठेवी देण्याबाबत असमर्थता दर्शविल्याने ठेवीदारांत खळबळ माजली आहे. ...

Another co-operative bank depositor in trouble | आणखी सहकारी बँकेचे ठेवीदार अडचणीत

आणखी सहकारी बँकेचे ठेवीदार अडचणीत

सांगली : इचलकरंजी येथील एका सहकारी बँकेच्या सांगलीतील टिंबर एरियातील शाखेने ठेवी देण्याबाबत असमर्थता दर्शविल्याने ठेवीदारांत खळबळ माजली आहे. याबाबत काही ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली असून, या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.

जिल्ह्यात अनेक सहकारी बँका अवसायनात गेल्या असून, हजारो ठेवीदार अडचणीत आले. ठेवी मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. अशातच मुख्य शाखा इचलकरंजीत असलेल्या एका सहकारी बँकेने जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना अडचणीत आणले आहे. गेल्या महिन्याभरापासून या बँकेचे धनादेश बाउन्स होत आहेत. रोख रकमेत ठेवी देण्याचे बँक टाळत आहे. याशिवाय संबंधित बँकेत असलेल्या खातेदारांनाही त्यांच्या खात्यावरील पैसे काढताना अडचणी येत आहेत. त्यामुळे याबाबत काही ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्याकडे तक्रार केली आहे.

जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडेही याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत संबंधित बँकेची चौकशी पूर्ण होऊन कारवाईबाबत पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. सांगलीतील काही ठेवीदारांनी याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे. सहकारी बँका आता रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली आल्याने याची गंभीर दखल रिझर्व्ह बँकेकडून घेतली जाईल, अशी आशा ठेवीदारांना आहे.

कोट

संबंधित बँकेबद्दल तक्रार आली आहे. ठेवीदाराने त्यांच्या खात्यावरील रक्कम मिळत नसल्याचे व धनादेश बाउन्स होत असल्याबद्दल तक्रार केली आहे. त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.

- निळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सांगली

कोट

इचलकरंजीतील त्या बँकेबाबत आमच्याकडे तक्रारी येत आहेत. लवकरच त्यांचा ऑडिट रिपोर्ट सादर होईल. त्यानंतर, तक्रारींबाबत शहानिशा करुन योग्य निर्णय घेतला जाईल.

- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर

Web Title: Another co-operative bank depositor in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.