जिल्ह्याला आणखी ३८ हजार लसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:25 IST2021-04-13T04:25:56+5:302021-04-13T04:25:56+5:30
सांगली : जिल्ह्यात शनिवारी आलेला ६८ हजार कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर असताना नवीन ३८ हजार लसी प्राप्त ...

जिल्ह्याला आणखी ३८ हजार लसी
सांगली : जिल्ह्यात शनिवारी आलेला ६८ हजार कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर असताना नवीन ३८ हजार लसी प्राप्त झाल्या. जिल्ह्यात लसीकरण वेगाने सुरू असून, सोमवारी २० हजार ३८५ जणांना लस देण्यात आली. नवीन लसी प्राप्त झाल्याने पुढील दोन दिवस लसीकरणावर परिणाम होणार नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
सध्या जिल्ह्यात २२७ केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दोन लाख ४३० लसी आल्या. यात एक लाख ७३ हजार ४३० कोव्हिशिल्ड, तर २७ हजार कोव्हॅक्सिन लस होत्या. सोमवारअखेर जिल्ह्यातील तीन लाख आठ हजार ८६४ जणांना लसी दिल्या. दोन दिवसांपूर्वी आलेले डोस संपण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे मंगळवारपासून लसीकरण थांबणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु जिल्हा आरोग्य खात्याने पाठपुरावा करून पुन्हा ३८ हजार लसी आरोग्य उपसंचालकांकडून सोमवारी दुपारी मिळाल्या. या लसीचे वितरण जिल्हाभर करण्यात आले. सोमवारी दिवसभरात २० हजार ३८५ जणांना लस देण्यात आली. एक ते दोन लाख लसी द्याव्यात, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
चौकट
महापालिका क्षेत्रात २५३५ व्यक्तींचे लसीकरण
महापालिका क्षेत्रात सोमवारी दिवसभरात २९ केंद्रांवर २५३५ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.