सांगली, मिरजेत आणखी १८ रुग्ण
By Admin | Updated: November 28, 2014 23:42 IST2014-11-28T23:25:02+5:302014-11-28T23:42:40+5:30
गॅस्ट्रोची साथ सुरूच : मिरजेत पाणी, ड्रेनेजच्या नवीन वाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू

सांगली, मिरजेत आणखी १८ रुग्ण
सांगली : महापालिका क्षेत्रामध्ये गॅस्ट्रोची साथ सुरुच असून, आज (शुक्रवार) सांगली- मिरजेत आणखीन १८ रुग्ण आढळले. दरम्यान, मिरजेतील समतानगर येथील आनंदा पारिसा कांबळे (वय ६२) यांचा उपचार सुरु असताना कॉलऱ्याने मृत्यू झाला. आज मिरजेत तेरा, तर सांगलीमध्ये पाच गॅस्ट्रोचे रुग्ण नव्याने आढळले. यावर तातडीचे उपाय म्हणून गॅस्ट्रो रुग्ण परिसरात ड्रेनेज व पाण्याची वाहिनी दुरुस्ती व नव्याने टाकण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे.
मिरजेतील शासकीय रुग्णालयात आज ११ जण, तर दोघे खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर सांगली, कुपवाड विभागामधील शासकीय रुग्णालयात दोन, तर खासगी रुग्णालयात तीन रुग्ण दाखल झाले आहेत. आजअखेर सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील २८ रुग्णांपैकी ६ जणांना उपचार करुन घरी पाठविण्यात आले असून, मिरजेमध्ये २९२ पैकी २५७ रुग्णांना उपचार करुन घरी पाठविण्यात आले आहे. ३५ रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये १९ नोव्हेंबरपासून आजअखेर गॅस्ट्रोसदृश ५७२ रुग्ण आढळले असून, यापैकी पाचशे रुग्णांना उपचार करुन घरी पाठविण्यात आले आहे.
महापालिकेतर्फे औषधोपचार, मेडिक्लोअर वाटप, जनजागृती पत्रकांचे वाटप, उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी सुरु आहे. पाईपलाईन लिकेजीस काढणे, कचरा उठाव व धूर फवारणीही करण्यात येत आहे. संशयित रुग्ण आढळलेल्या भागात तातडीने नवीन पाण्याची वाहिनी टाकणे, ड्रेनेज वाहिनी बदलणे, काही ठिकाणचे पाण्याचे कनेक्शन बंद करणे, वॉशआऊट करण्याचेही काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
गॅस्ट्रोने दगावणाऱ्यांची संख्या तेरावर
मिरज शासकीय रुग्णालयात गॅस्ट्रो रुग्णावर उपचार सुरु असताना आनंदा पारिसा कांबळे (वय ६२, रा. समतानगर, मिरज) या वृध्दाचा आज (शुक्रवार) सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे गॅस्ट्रोने दगावणाऱ्यांची संख्या आता तेरा झाली आहे. कांबळे यांना गॅस्ट्रो झाल्याने चार दिवसांपूर्वी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गॅस्ट्रोबाबत नागरिकांमध्ये अजूनही घबराट आहे.