वार्षिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त आहे?, मग रेशनच्या धान्यावर पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:32+5:302021-02-06T04:46:32+5:30

सांगली : तुमचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला रेशनवरुन सवलतीच्या दरात मिळणाऱ्या धान्यावर पाणी सोडावे लागणार ...

Annual income is more than lakhs ?, then leave water on ration grains | वार्षिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त आहे?, मग रेशनच्या धान्यावर पाणी सोडा

वार्षिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त आहे?, मग रेशनच्या धान्यावर पाणी सोडा

सांगली : तुमचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला रेशनवरुन सवलतीच्या दरात मिळणाऱ्या धान्यावर पाणी सोडावे लागणार आहे. होय, हे खरे आहे. केंद्र सरकारने नुकतेच तसे आदेश जारी केले असून, अशा शिधापत्रिकांचा शोध घेण्यास सांगितले आहे.

राज्यात लवकरच ही शोधमोहीम प्रत्यक्ष सुरु होईल. तुमचे घर स्लॅबचे असेल, घरात डिश टीव्ही असेल, चारचाकी वाहन असेल किंवा स्वत:च्या फ्लॅटमध्ये राहात असाल तर तुम्ही शिधापत्रिकेसाठी अपात्र आहात, असे शासनाचे म्हणणे आहे. या शोधमोहिमेत बीपीएल, अंत्योदय, एपीएल, पांढरी अशा सर्वप्रकारच्या शिधापत्रिकांची छाननी होणार आहे. त्यासाठी एक विशिष्ठ फॉर्म भरुन द्यावा लागेल. त्यात विचारलेली सर्व माहिती देणे सक्तीचे आहे.

चौकट

शासकीय, निमशासकीय नोकरदारांच्या शिधापत्रिका होणार रद्द

शासकीय, निमशासकीय नोकरदारांच्या शिधापत्रिका या मोहिमेत आपोआपच रद्द होणार आहेत. या सगळ्याच कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यांच्या शिधापत्रिका आपोआपच निकाली निघतील. सरकारी नोकरदारांना पांढऱ्या शिधापत्रिका देऊन शासनाने यापूर्वीच सवलतीच्या लाभापासून दूर ठेवले होते. शिधापत्रिकेचा उपयोग फक्त महसुली पुरावा म्हणून होत होता. शिधापत्रिका रद्द झालेल्या कुटुंबांच्या मागणीनुसार महसुली पुराव्यासाठी स्वतंत्र शिधापत्रिका दिली जाणार आहे.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती

अपात्र शिधापत्रिका शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत महापालिकेचे आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अ वर्ग नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा समावेश असेल. या शोध मोहिमेत दुबार शिधापत्रिका, अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिंच्या नावे असलेल्या शिधापत्रिका, स्थलांतरित कुटुंबे, मयत व्यक्तिंच्या नावे शिधापत्रिका या सर्वांचा निकाल लागणार आहे.

चौकट

या कारणांनी होईल शिधापत्रिका रद्द

स्लॅबचे घर, डिश टीव्ही, चारचाकी वाहन, स्वत:चा फ्लॅट, महिन्याला सुमारे ९ हजार वेतन अशी स्थिती असणाऱ्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये गृहित धरले जाईल. त्यांच्या शिधापत्रिका रद्द होतील. सरकारी व निमसरकारी नोकरदारांचे वेतन शासनाला माहिती असल्याने त्यांचा वेगळा शोध घेण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यांच्या शिधापत्रिका तत्काळ रद्द होतील. इतरांना मात्र हमीपत्र द्यावे लागेल.

चौकट

१ फेब्रुवारीपासून शोधमोहीम

दिनांक १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत अशा शिधापत्रिकांची शोधमोहीम राबवली जाणार आहे. विशिष्ठ नमुन्यातील फॉर्मसोबत रहिवासी पुरावा द्यावा लागेल. तो एका वर्षाचा आतील आवश्यक आहे. या फॉर्ममधील माहितीची प्रसंगी पोलिसांमार्फत छाननी करण्याचेही आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत.

चौकट

नवी शिधापत्रिका मिळणार

अपात्रतेमुळे शिधापत्रिका रद्द झाल्यानंतर नव्या शिधापत्रिकेसाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर शासनाकडून पाढऱ्या रंगाची नवी शिधापत्रिका मिळेल. त्यावर धान्य मिळणार नाही. पुरावा किंवा शासकीय कामकाजासाठी ती उपयुक्त ठरेल.

पॉईंटर्स

- एकूण शिधापत्रिका १६,१४,७९९

- प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका ३,७३,४०९

- अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका ३१,८४१

- एपीएल केशरी शिधापत्रिका २,३३,३४८

कोट

मयत आणि स्थलांतरित कुटुंबांची शोधमोहीम यापूर्वीच सुुरु केली आहे. नव्या एक लाख उत्पन्नाच्या अपात्रतेविषयी नमुना फॉर्म शासनाकडून अद्याप यायचे आहेत. ते येताच वितरीत केले जातील. एक लाख उत्पन्नाबाबत कुटुंबांनी हमीपत्र द्यायचे आहे.

- वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी

-------

--------

Web Title: Annual income is more than lakhs ?, then leave water on ration grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.