ताकारीच्या सरपंचांकडून वर्षाचे मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:43 IST2021-05-05T04:43:38+5:302021-05-05T04:43:38+5:30
बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) गावचे सरपंच अर्जुन पाटील यांनी एक वर्षाचे मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षा विमा व ...

ताकारीच्या सरपंचांकडून वर्षाचे मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी
बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) गावचे सरपंच अर्जुन पाटील यांनी एक वर्षाचे मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षा विमा व गणवेशासाठी दिले आहे.
याबाबत सरपंच पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचारी गावातील गल्लीबोळात घराघरांत जाऊन कोरोनासाठी काम करतात. त्यांना शासनाकडून संरक्षणकवच म्हणून काहीच उपकरणे दिली जात नसल्याने मी स्वत:चे मानधन आणि काही रक्कम असे १० हजार रुपये खर्चून ग्रामपंचायत सुरक्षाकवच दिले आहे.
कर्मचाऱ्यांना गणवेश, पीपीई किट, मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटाझर दिले असून, या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमाही दोन दिवसांत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्जुन पाटील हे असा आदर्श घालून देणारे परिसरातील पहिलेच सरपंच असून, यांच्या या कार्याचे विशेष कौतुक होत आहे.
याप्रसंगी उपसरपंच रवींद्र पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कुमार टोमके, रणजित पाटील, अमोल बोगर, महादेव सोळवंडे, राजेंद्र तुपे उपस्थित होते.