मिरजेत चारशेपैकी तीनशे मंडळांचे अन्नदान
By Admin | Updated: September 24, 2015 23:52 IST2015-09-24T22:46:42+5:302015-09-24T23:52:15+5:30
स्वागत कक्षाचा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी

मिरजेत चारशेपैकी तीनशे मंडळांचे अन्नदान
मिरज : येथील गणेश मंडळांनी यावर्षी देखावे व सजावटीचा खर्च टाळून अन्नदान सुरू केले आहे. मिरजेत चारशे मंडळांपैकी तीनशे मंडळे यावेळी अन्नदान करीत आहेत. काही मंडळांनी सलग दोन ते पाच दिवसांपर्यंत अन्नदानाचे आयोजन केले आहे.
विसर्जनप्रसंगी अन्नदान करणारी मंडळे गेल्या काही वर्षात अन्नदानाच्या उपक्रमाला प्राधान्य देत आहेत. मोठ्या मंडळांसोबत छोटी मंडळेही अन्नदान करीत आहेत. यावेळी बहुसंख्य गणेश मंडळांनी तिसऱ्या दिवसापासूनच अन्नदानास सुरुवात केली आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जमा होणाऱ्या पैशातून किंवा काही ठिकाणी स्वखर्चातून कार्यकर्ते अन्नदान करीत आहेत. मिरजेतील मंडळे आता सजीव देखाव्यांऐवजी अन्नदानाला महत्त्व देत असल्याने यावर्षी सजीव देखाव्यांची संख्या घटली आहे. देखावा, रोषणाई, सजावटीपेक्षा मंडळाच्या कार्यकर्त्यांची अन्नदानासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. गरीब अन्नदानाचा लाभ घेत आहेत. (वार्ताहर)
दुष्काळग्रस्तांना मदत
यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादीने विसर्जन मिरवणूक मार्गावरील स्वागत कक्ष रद्द केला आहे. स्वागत कक्षासाठी खर्च करण्यात येणारे २५ हजार रुपये दुष्काळग्रस्तांना मदत देणार असल्याचे युवक राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनी सांगितले.