अंजनीत नाही उभारली गुढी!
By Admin | Updated: March 22, 2015 00:26 IST2015-03-22T00:26:20+5:302015-03-22T00:26:20+5:30
गाव सुनेसुने : आर. आर. आबांच्या निधनाचे सावट कायम

अंजनीत नाही उभारली गुढी!
तासगाव : ज्या गावाची ओळख आर. आर. पाटील तथा आबांमुळे राज्यभर झाली, त्या ‘अंजनी’ने आज (शनिवारी) आपल्या लाडक्या नेत्यावरील प्रेम दाखवून दिले. घरातील एखाद्याचे निधन झाल्यानंतर वर्षभर सणवार न करण्याची प्रथा आबांच्या निधनानंतर अख्ख्या अंजनीने पाळली असून, आज गुढीपाडव्याला गावात एकही गुढी उभारली गेली नाही.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारीला आकस्मिक निधन झाल्याने अंजनी (ता. तासगाव) गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून हे गाव अजून सावरलेले नाही. येथील घराघरात वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन आबांना गृहीत धरूनच केले जायचे, आबाही प्रत्येक कुटुंबांत रमायचे, पण आज आबाच नाहीत, त्यामुळे वर्षभर सणवार, उत्सव, कार्यक्रम करायचे नाहीत, असे जणू गावाने ठरवूनच टाकले आहे.
राजकारणाचा श्रीगणेशा झाल्यापासून अंजनीने पूर्ण ताकदीने आबांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतली होती. गेल्या १५ वर्षात आबांच्या मंत्री, उपमुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत अंजनीचा रूबाब काही औरच होता. राज्यातील बड्या-बड्यांचा वावर, राज्यभरातील कार्यकर्त्यांची रीघ, पोलिसांचा ताफा, हेलिकॉप्टरच्या चकरा हे गावातील आठवडा-पंधरवड्याचे ठरलेले चित्र. परिसरातील एकमेव हेलिपॅड या गावातच तयार करण्यात आले होते. आबांच्या जडणघडणीत अंजनीचे योगदान आणि गावाचा लौकीक राज्यभरात वाढता ठेवण्यात आबांचे योगदान मोठे होते.
आबांच्या अकाली निधनाची जखम ग्रामस्थांच्या काळजात घर करून राहिली आहे. त्यामुळेच आज गुढीपाडवा असला तरी गावावर आबांच्या निधनाचे सावट दिसत होते. गावातील वातावरण सुनेसुने होते. गावात एकही गुढी उभारली गेली नाही. गुढी उभी न करता ग्रामस्थांनी आबांना आदरांजली वाहिली. (वार्ताहर)