अंजलीला मिळाला मदतीचा हात!
By Admin | Updated: April 1, 2015 00:00 IST2015-03-31T23:05:03+5:302015-04-01T00:00:50+5:30
जपान दौऱ्यासाठी निवड : ‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद

अंजलीला मिळाला मदतीचा हात!
ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील शेतमजुराची मुलगी अंजली आनंदा कोकरे हिने देशपातळीवरील इन्स्पायर अॅवॉर्ड प्रदर्शनात सादर केलेल्या बहुउद्देशीय कृषी यंत्राला पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यानंतर तिची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे सकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅम आॅफ जपानच्या वैज्ञानिक दौऱ्यासाठी जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. तिला मदतीची गरज आहे, याबाबत ‘लोकमत’ने ‘शेतमजुराची मुलगी चालली जपानला, अंजलीला हवाय दानशूरांच्या मदतीचा हात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. हे वृत्त वाचून आजपर्यंत सुमारे १0 जणांनी ५९ हजार रुपयांची आर्थिक मदत अंजलीला केली आहे.अंजली कोकरे हिने बनविलेल्या बहुउद्देशीय कृषी यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला होता. इन्स्पायर अॅवॉर्ड विजेत्यांची केंद्र सरकारच्यावतीने सकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅमसाठी मे महिन्यात जपान दौऱ्यासाठी निवड केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातून एकमेव अंजलीची निवड झाली आहे.अंजलीचे वडील शेतमजूर आहेत. तिला जपानला जाण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्या अनुषंगाने ‘लोकमत’ने मदतीचे आवाहन करण्यासाठी वृत्त प्रसिध्द केले होते. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आजपर्यंत यशवंत युवक संघटना शिराळा यांनी २0 हजार, इस्लामपूर येथील उद्योजक सर्जेराव यादव यांनी १0 हजार, अरविंद आनंदराव कुलकर्णी सांगली ११ हजार रुपये, प्रशांत प्रल्हाद कोळेकर, दत्तात्रय आप्पा कोळेकर, डॉ. प्रकाश भीमराव कोळेकर (सर्व रा. किडेबिसरी, ता. सांगोल, जि. सोलापूर) यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये, रज्जाक मुल्ला बावची यांनी २ हजार, कर्मवीर हायस्कूलचे शिक्षक बी. आर. पाटील ५०० रुपये, ईश्वर पाटील कोरेगाव ५०० रुपयांची आर्थिक मदत अंजलीला केली आहे. (वार्ताहर)
‘लोकमत’चे अभिनंदन
‘अंजली कोकरे हिला मदतीची गरज’ हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला. तसेच हे वृत्त प्रसिध्द केल्याबद्दल ‘लोकमत’चेही विशेष आभार मानले.