‘अंनिस’ने ‘यशाचे रहस्य’ उधळले
By Admin | Updated: February 21, 2015 00:16 IST2015-02-20T23:51:31+5:302015-02-21T00:16:00+5:30
‘अंनिस’ने ‘यशाचे रहस्य’ उधळले

‘अंनिस’ने ‘यशाचे रहस्य’ उधळले
शिराळा: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिराळा शाखेच्या कार्यकर्त्यांनी एका कंपनीमार्फत चालविले जाणारे ‘जाणूया यशाचे रहस्य’ हे शिबिर उधळून लावले. तसेच कंपनीने दावा केलेले चमत्कार प्रत्यक्षात करून दाखविल्यास २१ लाखाचे बक्षीस जाहीर केले. मात्र कंपनीने त्यास नकार देत शिबिर गुंडाळले. शिबिरार्थींकडून घेतलेले प्रत्येकी अडीच हजार रुपये शुल्क परत केले.
१९ फेबु्रवारी रोजी संबंधित कंपनीने एकाग्रता, मन:शांती, निर्णय क्षमता, इच्छाशक्ती, भीती घालविणे, आत्मविश्वास वाढविणे तसेच दोनशे वर्षाचे कॅलेंडर लक्षात ठेवणे अशी अनेक आमिष दाखवत मोफत प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशीच्या शिबिरासाठी अडीच हजार रुपये शुल्क ठेवले होते. आज (शुक्रवार) येथील व्यापारी सभागृहामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र याबाबत माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक, तहसीलदार, आयकर विभाग अशा सर्वच संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये निवेदन देऊन अशा प्रकारचे शिबिर म्हणजे निव्वळ फसवणूक असल्याचे कळविले होते.
यानंतर आज प्रा. विजयकुमार जोखे, प्रकाश शिंत्रे, गणेश क्षिरसागर, के. आर. गावडे यांनी या शिबिराच्या ठिकाणी जाऊन पालक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. तसेच अशा प्रकारचे दावे म्हणजे निव्वळ फसवणूक असल्याचे सांगत संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीना आव्हान दिले. मात्र त्यांनी पळ काढला (वार्ताहर)
२१ लाखांचे बक्षीस
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हे शिबिर कसे योग्य आहे, हे पटवून द्या, आम्ही अंनिसमार्फत २१ लाखांचे बक्षीस देऊ, असे जाहीर आव्हान दिले. यानंतर मात्र कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी माघार घेत शिबिरांचे प्रत्येकी अडीच हजार रुपये परत करून आपला गाशा गुंडाळला. याबाबत अंनिसकडून इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.