सावळी येथे ‘अंनिस’ने भोंदूबुवाला पकडले
By Admin | Updated: May 14, 2016 00:51 IST2016-05-14T00:51:34+5:302016-05-14T00:51:34+5:30
माफीनामा लिहून दिला

सावळी येथे ‘अंनिस’ने भोंदूबुवाला पकडले
कुपवाड : अमावास्या व पौर्णिमेच्या रात्री स्मशानात जाऊन मारण मंत्राने दुश्मनांना मारून टाकणे, ज्वारीचे दाणे घेऊन कौल लावणे, लागीर काढणे, असे भोंदू प्रकार करणाऱ्या सावळी (ता़ मिरज) येथील भोंदूबुवाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी पर्दाफाश केला.
अशोक यशवंत माळी (वय ५९) असे त्याचे नाव आहे. यापुढे असे करणार नसल्याचा माफीनामा लिहून घेतल्यानंतर कुपवाड पोलिस ठाण्यातून त्याला सोडून देण्यात आले.
अशोक माळी हा ‘अण्णा महाराज’ या नावाने परिचित आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याची भोंदूगिरी सुरू होती. अमावास्या व पौर्णिमेच्या रात्री स्मशानात जाऊन मारण मंत्राने दुश्मनांना मारून टाकणे, ज्वारीचे दाणे घेऊन कौल लावणे; तसेच लागीर काढणे, आदी प्रकार करत असल्याच्या भूलथापा मारून तो लोकांना फसवत होता. त्याच्या या भोंदूगिरीची माहिती ‘अंनिस’चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील यांना दोन महिन्यांपूर्वी मिळाली होती. त्यानंतर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. डॉ़ पाटील व प्रियांका तुपलोंढे त्याच्याकडे गेले़ लोंढे यांनी पती मारहाण करीत असल्याची तक्रार मांडली़ त्यावेळी माळी याने एका पाटावर ज्वारीची मूठ घेऊन कौल लावला़ शिवाय लोंढे यांना घरातून कणिक घेऊन येण्यास सांगितले़ लोंढे यांनी कणिक आणल्यानंतर माळी याने पार्वतीदेवी जमिनीतून प्रकटली असल्याचे सांगून लोंढे व डॉ. पाटील यांना एका मंदिरासमोर नेले़ तेथे त्याने इतरही भोंदूगिरीचे प्रकार केले.
माळी याची ही भोंदूगिरी लक्षात येताच डॉ़ पाटील यांच्यासह प्रियांका तुपलोंढे, अॅड़ चंद्रकांत शिंदे, ज्योती आदाटे, जावेद पेंढारी, श्रावण साबळे, राणी कदम, बाळासाहेब पाटील या कार्यकर्त्यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक अशोक भवड यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी कार्यकर्त्यांनी माळीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर माळीने शरणागती पत्करली़ यापुढे असे प्रकार करणार नाही, असा माफीनामा लिहून दिला. त्यामुळे सायंकाळी त्याला सोडून देण्यात आले़
चौथा भोंदूबुवा
‘अंनिस’ने सांगलीतील दोन, आष्टा (ता. वाळवा) व सावळी (ता. मिरज) येथील प्रत्येकी एक, अशा चार भोंदूबुवांना पकडले आहे. अजूनही काही भोंदूबुवा रडारवर असल्याचे डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले.