पोलीस कोठडीत बादलीतील पाण्यात अनिकेत कोथळेला तोंड बुडवून मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:51+5:302021-01-19T04:28:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अनिकेतचे तोंड पोलीस कोठडीत बादलीतील पाण्यात बुडवल्यानंतर तो तडफडत होता. त्यानंतर तो निपचित पडला. ...

पोलीस कोठडीत बादलीतील पाण्यात अनिकेत कोथळेला तोंड बुडवून मारले
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अनिकेतचे तोंड पोलीस कोठडीत बादलीतील पाण्यात बुडवल्यानंतर तो तडफडत होता. त्यानंतर तो निपचित पडला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने माझ्या डोक्याला रिव्हॉल्वर लावत हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी दिली, अशी साक्ष अनिकेत कोथळे खून खटल्याचा प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याने सोमवारी न्यायालयात दिली.
अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलीस कोठडीतील मारहाणीनंतर मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला होता. कोरोनामुळे स्थगित असलेल्या या खटल्याची सुनावणी सोमवारपासून पुन्हा सुरू झाली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर हा खटला सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम बाजू मांडत आहेत.
सोमवारी अनिकेतचा मित्र व घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याची साक्ष झाली.
अमोल भंडारेने सांगितले की, घटनेच्या रात्री आठच्या सुमारास आम्हा दोघांना लॉकअपमधून बाहेर काढण्यात आले. तेथे पोलीस कर्मचारी अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झाकीर पट्टेवाले होते. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने खोलीचा दरवाजा बंद करत मारहाण करण्यास सुरुवात केली. अनिकेतचे हातपाय दोरीने बांधण्यात आले होते. कामटेने त्याला उलटे टांगायला सांगितले. छताला उलटे टांगल्यानंतर त्याला बुरखा घालण्यात आला. नंतर पाण्याच्या बादलीत त्याचे तोंड बुडवले. कामटेच्या सांगण्याप्रमाणे टोणे, लाड, पट्टेवाले दोरी हळूहळू खाली सोडत होते. डोके पाण्यात बुडल्यानंतर अनिकेत तडफडत होता. ‘श्वास गुदमरतोय, बुरखा काढा’, असे तो ओरडत होता. त्यानंतर तो निपचित पडला. त्यावेळी मला त्याच्या पाठीवर बसण्यास सांगत त्याच्या तोंडात फुंकर मारण्यास सांगितले. मात्र उपयोग झाला नाही. नंतर मुल्ला मला गणेश विसर्जन घाटावर घेऊन गेला. तेथे एक पोलीस गाडी आणि मोटार आली. मला मोटारीच्या डिकीत बसण्यास सांगण्यात आले. यावेळी अनिकेतचा मृतदेह पोलीस गाडीतून मोटारीत ठेवण्यात आल्याचे दिसले. साडेतीन तासांनंतर मोटार थांबली. त्यावेळी मला मृतदेह जळाल्याचा वास आला. त्यानंतर कामटे, लाड, टोणे मोटारीत येऊन बसले. ‘हा प्रकार कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुलाही असेच मारून टाकू’, अशी धमकी कामटे आणि टोणेने दिली.
आता मंगळवारी अमोलची उलटतपासणी होणार आहे.
चौकट
गोळ्या घालून ठार मारू
लाड, टोणे व कामटे मोटारीत येऊन बसल्यानंतर कामटेने माझ्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावत, ‘मी आणि अनिकेत दोघेजण पळून गेलो होतो, मी निपाणीला गेलो तर अनिकेत कोठे गेला याची मला माहिती नाही, असे सांग, नाहीतर तुलाही गोळ्या घालून ठार मारू’, असे धमकी कामटेने दिल्याचे भंडारे याने न्यायालयासमोर सांगितले.