नाराज माजी संचालक मोट बांधणार
By Admin | Updated: August 1, 2015 00:35 IST2015-08-01T00:28:06+5:302015-08-01T00:35:14+5:30
भारत डुबुले: ताकद दाखवू, दोन दिवसात निर्णय

नाराज माजी संचालक मोट बांधणार
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी संचालकांना डावलण्यात आल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. नाराज संचालकांंची मोट बांधण्याची तयारी सुरू असून, यासंदर्भात आगामी दोन दिवसात भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीप्रणित शेतकरी सहकारी पॅनेल व काँग्रेसप्रणित वसंतदादा रयत पॅनेलमध्ये माजी संचालकांना स्थान देण्यात आलेले नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत दीडशे कोटीचा घोटाळा झाला असताना तेथे माजी संचालकांना स्थान देण्यात आले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील संचालकांनी तीस कोटीचा निधी शिल्लक ठेवला आहे. यापूर्वी तेथे कर्मचाऱ्यांचे पगार करताना अडचणी होत होत्या. असे असताना त्यांना का डावलण्यात आले, असा सवाल माजी संचालक करीत आहेत.
माजी सभापती भारत डुबुले म्हणाले की, नेतेमंडळींनी आम्हाला विचारत घेतले नाही. आता त्यांनी आम्हाला आगामी निवडणुकीत गृहित धरू नये. उमेदवारी जाहीर करताना विचारातही घेतले नाही. बाजार समितीमध्ये चांगली कामगिरी झाली असताना माजी संचालकांना डावलण्यात आले आहे. जिल्हा बँकेत माजी संचालकांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात असताना बाजार समितीमध्ये का संधी दिली जात नाही? याबाबत माजी संचालकांशी चर्चा करून आगामी दोन दिवसात आम्ही आमची भूमिका जाहीर करु. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांमध्ये चुरस
मार्केट यार्डमध्ये व्यापारी प्रतिनिधी व हमाल-तोलाईदार प्रतिनिधींमध्ये चुरस वाढली आहे. प्रचारासाठी उपस्थित राहताना नेतेमंडळींची कसरत होत आहे. सध्यातरी व्यापारी, हमाल नेते सर्वांच्याच प्रचारासाठी उपस्थित रहात आहेत. हमाल प्रतिनिधीसाठी बाळासाहेब बंडगर यांच्या प्रचाराला शुक्रवारी प्रारंभ झाला.