मोबाइल ॲपवर इंग्रजी माहिती भरताना अंगणवाडी सेविकांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:42+5:302021-04-20T04:27:42+5:30
सांगली : महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना पोषण आहारासंदर्भात माहिती भरण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप उपलब्ध करून दिले ...

मोबाइल ॲपवर इंग्रजी माहिती भरताना अंगणवाडी सेविकांची दमछाक
सांगली : महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना पोषण आहारासंदर्भात माहिती भरण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या ॲपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नसल्याने अंगणवाडी सेविकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ॲपवर इंग्रजी व हिंदी या दोन भाषांचा समावेश असल्याने माहिती भरताना अंगणवाडी सेविकांची पुरती दमछाक होत आहे. बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंबंधी दैनंदिन माहिती ऑनलाइन व्हावी यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले आहेत; परंतु पोषण ट्रॅकर ॲपवर केवळ इंग्रजी व हिंदी भाषेचा पर्याय दिला आहे. ज्या लाभार्थ्यांची माहिती मोबाइल ॲपवर अपलोड केली जाईल, त्यांनाच लाभ मिळेल, अशा सूचना दिल्या आहेत; परंतु या सॉफ्टवेअरमध्ये मराठी भाषेचा उल्लेख नसल्याने अंगणवाडी सेविकांची दमछाक होत आहे. इंग्रजीचे ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून ही माहिती भरून घ्यावी लागत आहे. अंगणवाडी सेविकांना पोषण आहार, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक गृहभेटी, शिधावाटप, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल आदी माहिती दररोज अपलोड करावी लागत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने या कामात व्यत्यय येत आहे.
अतिशय तुटपुंज्या मानधनात काम करीत असलेल्या अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन देण्यात आले आहेत; परंतु रिचार्जचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने त्यांना स्वतःच्या पैशातून रिचार्ज करून काम करावे लागत आहे. रिचार्जची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मोबाइलही व्यवस्थित चालत नसल्याचा अनेक अंगणवाडी सेविकांचा आरोप आहे.
चौकट
मोबाइल ॲपवर माहिती भरण्यास विरोध : आनंदी भोसले
अंगणवाडी सेविकांचे शिक्षण दहावीपर्यंत आहे. या सेविकांना इंग्रजीत माहिती भरता येणार नाही. पोषण आहाराची माहिती भरण्यास विरोध नाही; पण मोबाइल ॲपवर माहिती भरण्याची मराठी भाषेची साेय केली पाहिजे, तरच सेविका माहिती भरतील. अन्यथा आमचा ॲपवर माहिती भरण्यास तीव्र विरोध आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्षा आनंदी भोसले यांनी दिली.
कोट
मोबाइल ॲपवर माहिती भरण्याचे स्वॉफ्टवेअर केंद्र शासनाने विकसित केले आहे. ॲपचे प्रात्यक्षिक चालू आहे. सध्या या ॲपवर इंग्रजीच भाषा असून, थोड्याच दिवसांत मराठी भाषाही उपलब्ध होईल. तोपर्यंत अंगणवाडी सेविकांनी इंग्रजीत माहिती भरावी लागणार आहे.
- शिल्पा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.