उगारच्या खातेदाराची रक्कम लंडनच्या एटीएममधून लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2015 00:03 IST2015-04-19T23:32:33+5:302015-04-20T00:03:19+5:30

बनावट कार्डद्वारे लूट : ६८ हजारांचा गंडा

The amount of the dealer's money will be borne by the London ATM | उगारच्या खातेदाराची रक्कम लंडनच्या एटीएममधून लंपास

उगारच्या खातेदाराची रक्कम लंडनच्या एटीएममधून लंपास

शिरगुप्पी : उगार (ता. अथणी) येथील आयसीआयसीआय बॅँकेच्या खातेदाराच्या बॅँक खात्यावरील रक्कम बनावट एटीएम कार्ड वापरून लंडनमधील एटीएम सेंटरमधून काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खातेदार विश्वनाथ देसाई यांनी आपल्या बॅँक खात्यातील ६८ हजारांची रक्कम गायब झाल्याची फिर्याद कागवाड पोलीस ठाण्यात दिली आहे.
उगार येथील विश्वनाथ देसाई हे व्यवसायाने छायाचित्रकार आहेत. त्यांचे आयसीआयसीआय बॅँकेच्या उगार शाखेत बचत खाते आहे. १४ एप्रिलला त्यांच्या मोबाईलवर बॅँक खात्यातून ६८ हजार रूपये काढल्याचा मेसेज आला. पैसे काढलेले नसताना असा मेसेज आल्याने धक्का बसलेले देसाई तातडीने बॅँकेत धावले. एटीएम कार्ड आपल्याजवळ असून आपण पैसे काढले नसताना हा मेसेज कसा आला, अशी विचारणा त्यांनी केली. यावेळी बॅँकेत त्यांच्या खात्यावरून रक्कम काढली गेल्याचे सांगण्यात आले.
बॅँकेच्या शाखाप्रमुखांनी याबाबत चौकशी करून ७२ तासात माहिती देण्याचे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी देसाई पुन्हा बॅँकेत गेले असता अद्याप माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर १७ एप्रिलला देसाई पुन्हा बॅँकेत गेले. यावेळी शाखाधिकाऱ्यांनी त्यांना लंडनमधील आॅक्सफर्ड स्टेशननजीकच्या एटीएम सेंटरमधून ही रक्कम काढण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकाराने देसाई यांना जबर धक्का बसला आहे. (वार्ताहर)

तपास सायबर क्राईमकडे
बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती बॅँकेच्या लेटरपॅडवर सहीशिक्क्यासह लिहून देऊन पोलिसात तक्रार करू शकता, असे सांगितले. यानंतर देसाई यांनी बॅँकेने दिलेल्या पत्रानुसार कागवाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकारामुळे उगार परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण सायबर क्राईम विभागाकडे सोपविणार असल्याचे कागवाडचे उपनिरीक्षक कौजलगी यांनी सांगितले.

Web Title: The amount of the dealer's money will be borne by the London ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.