अमोल हंकारे यांचे राष्ट्रीय पातळीवर यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:30 IST2021-08-27T04:30:14+5:302021-08-27T04:30:14+5:30
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खोतवस्ती (थबडेवाडी) येथील महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर अवाॅर्ड विजेते शिक्षक अमोल किसन ...

अमोल हंकारे यांचे राष्ट्रीय पातळीवर यश
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खोतवस्ती (थबडेवाडी) येथील महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर अवाॅर्ड विजेते शिक्षक अमोल किसन हंकारे यांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या कल्पक प्रयोगाला पुन्हा एकदा सन्मान मिळवून दिला आहे. त्यांनी लहान मुलांसाठी तयार केलेल्या वर्ल्ड मॅचिंग गेमला ‘बेस्ट डिजिटल गेम’ यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद व केंद्रीय प्रायोगिकी संस्थान नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या २५ व्या अखिल भारतीय बाल आडीयो-व्हिडीओ आणि नवीन माहिती तंत्रज्ञान साहित्य स्पर्धा व आयसीटी महोत्सव २०२१ घेण्यात आला. यामध्ये अमोल हंकारे यांनी यश संपादन केले आहे.
वर्ल्ड मॅचिंग गेममधून खेळातून इंग्रजी मुळाक्षरे व त्यावरील शब्द यांच्या जोड्या जुळवत खेळातून शिक्षण घेण्याची पद्धत विकसित केली आहे. यामुळे हा गेम या स्पर्धेत अव्वल ठरला.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थ्यांचे आंतरक्रियात्मक स्वयंअध्ययन केल्यामुळे संगणक स्वतः हाताळला, तर त्याचे अवधान चांगले राहून मुलांचे शिकणे सोपे होईल, असा एक अनोखा प्रयत्न हंकारे यांनी केला. त्यांना विद्या प्राधिकरण पुणे, सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन मिळाले.