मिरज पंचायत समितीत हमरीतुमरी
By Admin | Updated: September 11, 2015 00:53 IST2015-09-11T00:53:18+5:302015-09-11T00:53:28+5:30
विशेष सभा : सांगली बाजार समिती स्वीकृत सदस्य पदावरून संघर्ष

मिरज पंचायत समितीत हमरीतुमरी
मिरज : मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेत बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदासाठी काँग्रेस सदस्यांनी बहुमताच्या बळावर नरवाडचे सदस्य बाबासाहेब कांबळे यांच्या नावाचा ठराव केला व सभेत गुप्त मतदानावरून व तहकूब सभा घेण्यावरून सत्ताधारी व विरोधी सदस्यांत हमरीतुमरी झाली. सभापती दिलीप बुरसे यांनी गुप्त मतदानाची मागणी फेटाळल्याने, विरोधी राष्ट्रवादी सदस्यांनी सभात्याग केला.
बाजार समितीच्या स्वीकृत संचालक पदाच्या ठरावासाठी मिरज पंचायत समितीत सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. पंचायत समितीतून एका सदस्याच्या नावाची शिफारस होणार असल्याने, सत्ताधारी काँग्रेस सदस्यांत अनेक इच्छुक होते. सभेपूर्वी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमर पाटील यांनी सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत माजी सभापती अशोक मोहिते ठरावासाठी इच्छुक होते, मात्र अमर पाटील यांनी, पंचायत समितीची पदे मिळालेल्यांना संधी न देण्याची भूमिका घेतल्याने बरीच खलबते झाली. अखेर नरवाडचे बाबासाहेब कांबळे यांच्या नावावर एकमत झाले. सकाळी ११ वाजता होणारी सभा सभापती दिलीप बुरसे यांनी तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर २ वाजता घेण्याचा प्रयत्न केला. विरोधी सदस्यांनी सभेच्या विलंबाबाबत जाब विचारल्यानंतर, कोरमअभावी तहकूब केलेली सभा घेत असल्याचा पवित्रा सभापतींनी घेतला. यावरून काँग्रेस सदस्य व विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांत हमरीतुमरी झाली. विरोधकांच्या मागणीनुसार तहकूब सभा ३ वाजता घेण्यात आली. विरोधकांनी सभेच्या सुरुवातीस तहकूब सभेच्या इतिवृत्ताची मागणी केली. इतिवृत्त उपलब्ध नसल्याने काही वेळ सभेचे कामकाज रेंगाळले.
सभेत पक्षबैठकीत ठरल्याप्रमाणे स्वीकृत संचालक पदासाठी काँग्रेस सदस्य आबासाहेब चव्हाण यांनी बाबासाहेब कांबळे यांचे नाव सुचविले. त्यास प्रवीण एडके यांनी अनुमोदन दिले. विरोधी गटातून राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अरुण राजमाने यांचे नाव भाजपचे सदस्य सतीश नीळकंठ यांनी सुचविले. त्यास शंकर पाटील यांनी अनुमोदन दिले. हात वर करुन मतदान होईल, असे सभापती दिलीप बुरसे यांनी सांगितले. याला विरोधी गटाचे अरुण राजमाने, सतीश निळकंठ, शंकर पाटील यांनी विरोध दर्शवित गुप्त मतदानाची जोरदार मागणी केली.
सभापती बुरसे यांनी, काँग्रेस सदस्यांची मागणी असल्याने मतदान हात वर करुनच होईल, अशी भूमिका घेत गुप्त मतदानाची मागणी फेटाळली. यावरून सत्ताधारी सदस्य व विरोधी सदस्यांत वादावादी, हमरीतुमरी झाली. बहुमताच्या बळावर अन्याय केल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. सभेत काँग्रेसच्या सभापतींसह १२, तर विरोधी राष्ट्रवादीचे ६ व भाजपचा एक असे सदस्य उपस्थित होते. ११ विरुध्द सात मतांनी बाबासाहेब कांबळे यांच्या शिफारशीचा ठराव करण्यात आला. (वार्ताहर)