आमणापूर शिवारात हत्यारबंद व्यक्तींचा वावर
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T22:35:16+5:302015-07-25T01:13:30+5:30
नागरिकांत दहशतीचे वातावरण : शेतकरी दाम्पत्याला हुसकावून लावले

आमणापूर शिवारात हत्यारबंद व्यक्तींचा वावर
भिलवडी : आमणापूर (ता. पलूस) येथील कुरण, डुकरी, दरडा, सरळी या शिवारांमध्ये हत्यारबंद व्यक्तींचा वावर असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने, नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सकाळी दरडा परिसरातील शेतात गेलेले शेतकरी सुभाष अनुगडे व त्यांच्या पत्नीला काही अनोळखी व्यक्तींनी भीती दाखवून हुसकावून लावले. यापूर्वीही अनुगडेवाडी वस्तीवरील शेतकऱ्यांना काही हत्यारबंद व्यक्ती उसाच्या शेतामध्ये संशयास्पदरित्या वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी सचिन राडे या शेतकऱ्याचा तीन अज्ञात व्यक्तींनी पाठलाग केला होता. आणखी दोन शेतकऱ्यांनाही तीन अज्ञात व्यक्ती दिसल्या होत्या. आमणापूर परिसरात चोरांचा संशयास्पद वावर वाढला असला तरीही, चोरी किंवा कोणताही अनुचित असा प्रकार घडला नाही. कोणाही नागरिकाला शारीरिक इजाही केलेली नाही. मग हे लोक शिवारात राहून दहशत का निर्माण करतात, हेच लक्षात येत नाही.आमणापूर-येळावी रस्त्यालगत शेतात महिलेचे अवयव व धड सापडल्याने व त्याचे गूढ अद्यापही न उलगडल्याने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. आमणापुरात एकूण जमिनीच्या ऐंशी टक्के क्षेत्रात उसाचे पीक असल्याने संशयितांना लपून बसण्यास मोठा वाव आहे. आमणापुरातील साठ टक्के महिला शेतमजूर आहेत. महिला वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे. आमणापूर आणि परिसरातील नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी गस्त सुरू करावी. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही घटना घडल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधून दक्षता घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
भीतीमुळे शेतीची कामे झाली ठप्प
चोरांबद्दल एखादी माहिती किंवा अफवा जरी कानावर आली तरी, शेतातील कामे अर्ध्यावर टाकून रोजगारी घरी परतत आहेत. चोरांच्या दहशतीने शेतीकाम करण्यासाठी पुरुष-महिला असे कोणतेच रोजगारी उपलब्ध होईनात. त्यामुळे शेतीमधील कामे बंद आहेत.आमणापूर-येळावी रस्त्यालगत शेतात महिलेचे अवयव व धड सापडल्याने व त्याचे गूढ अद्यापही न उलगडल्याने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. आमणापुरात एकूण जमिनीच्या क्षेत्रात ऊस पीक जास्त असल्याने संशयितांना लपून बसण्यास मोठा वाव आहे.