पशुधन पदविकाधारकांना पशुधनावर उपचारास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:38+5:302021-08-15T04:26:38+5:30
सांगली : पशुवैद्यकीय पदवीधारक स्वत: पशुधनावर वेळेत उपचार करत नाहीत. पशुधन पदविकाधारकच ग्रामीण भागामध्ये उपचार करीत आहेत. तरीही पशुवैद्यकीय ...

पशुधन पदविकाधारकांना पशुधनावर उपचारास परवानगी द्या
सांगली : पशुवैद्यकीय पदवीधारक स्वत: पशुधनावर वेळेत उपचार करत नाहीत. पशुधन पदविकाधारकच ग्रामीण भागामध्ये उपचार करीत आहेत. तरीही पशुवैद्यकीय पदवीधारक पशुधन पदविकाधारकांची अडवणूक करीत आहेत. यावर शासनाने ठोस निर्णय घेऊन पशुधन पदविकाधारकांना पशुधनावर उपचारास रितसर परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटना सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी केली आहे.
कोले पुढे म्हणाले की, राज्यातील खाजगी पशुवैद्यकीय पदविका आणि प्रमाणपत्रधारकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या काही दिवसापासून पशु-पक्षांवर उपचार न करण्याचे धोरण अवलंबले आहे. नोंदणीकृत पदवीधर पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या नियंत्रण व पर्यवेक्षणाखालीच उपचार करण्याची अट असल्याने, पदविका व प्रमाणपत्रधारकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आम्हा शेतकरी, शेतमजुरांच्या पाळीव पशु- पक्षांवर उपचार थांबले आहेत. पदवीधर पशुवैद्यक यांची संख्या तोकडी आहे. त्यातच ही मंडळी शहरात राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील आमच्या पशुधनावर वेळेत उपचार होत नाहीत. अनेक वर्षांपासून पदविका व प्रमाणपत्रधारकच पशुधनाला सेवा देत आले आहेत. जोपर्यंत पदवीधर पशुवैद्यक वेळेवर उपचारासाठी येत नाहीत व त्यांची पुरेशी संख्या वाढत नाही, तोपर्यंत पदविकाधारकांना उपचारासाठी परवानगी द्यावी. तसे न केल्यास आमच्या पशुधनावर वेळेत उपचार होणार नाहीत. पशुपालकांचे नुकसान होणार. म्हणून शासनाने पदविकाधारकांना पशुधनावर उपचारासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.