मराठा समाजाच्या मोर्चास सर्वपक्षीय पाठिंबा
By Admin | Updated: September 13, 2016 00:46 IST2016-09-13T00:00:13+5:302016-09-13T00:46:44+5:30
पलूसमधील बैठकीत निर्णय : हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

मराठा समाजाच्या मोर्चास सर्वपक्षीय पाठिंबा
पलूस : सांगली येथे दि. २७ रोजी आयोजित केलेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये पलूस तालुक्यातून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार सोमवारी येथे झालेल्या सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्र्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.
सांगली येथे २७ सप्टेंबर रोजी आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी येथील संग्राम लॉन येथे पलूस तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे विजयसिंह महाडिक यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते पुढे येत आहेत. स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही आघाडीवर आहेत. समन्वयाने नियोजन करून मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी दत्ता उथळे यांनी क्रांती मोर्चाविषयी माहिती दिली. मोर्चामध्ये स्वच्छता, वाहने पार्किंग शिस्त याविषयी संयोजकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीत गावनिहाय बैठका घेऊन प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष भेटून मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्याचे ठरवण्यात आले आहे. अख्तर पिरजादे यांनी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आसल्याचे सांगितले, तर प्रमोद हजारे यांनी मोर्चास धनगर समाजाचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी जयकर पाटील, नारायण निकम, चेतन जाधव, इंद्रजित पवार, संतोष चव्हाण, विकास पाटील, चंद्रकांत आरबुने, आनंदा भोसले, अमर इनामदार, पोपट मोरे, सतीश पाटील, वैभव पवार, विजय पवार यांची भाषणे झाली. जयकर पाटील यांनी स्वागत केले.
बैठकीस तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष ए. डी. पाटील, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद लाड, बापूसाहेब येसुगडे, विश्वास पाटील, संदीप पाटील, भरत इनामदार, झुंझार शिंदे, रणजित यादव, मिलिंद पाटील व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. दत्ता उथळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)