मिरज पश्चिम भागावर युती, राष्ट्रवादीचे लक्ष

By Admin | Updated: August 27, 2014 23:14 IST2014-08-27T23:04:15+5:302014-08-27T23:14:04+5:30

विधानसभा निवडणूक : संपर्क बैठकांवर जोर

Alliance, NCP's attention on Miraj west part | मिरज पश्चिम भागावर युती, राष्ट्रवादीचे लक्ष

मिरज पश्चिम भागावर युती, राष्ट्रवादीचे लक्ष

सोमनाथ डवरी - कसबे डिग्रज --आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज पश्चिम भागावर महायुतीसह राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले आहे. एकीकडे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी विविध गावात दौरे, आढावा बैठकांद्वारे संपर्क वाढविला आहे, तर दुसरीकडे नानासाहेब महाडिक गटाकडूनही परिसरात संपर्क बैठका सुरू आहेत. महाडिक यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. महायुतीसह काँग्रेस, संभाजी पवार गट, सर्वोदयमधील असंतुष्ट यांच्यासह सर्व जयंत पाटील विरोधकांशी महाडिक संपर्क साधत आहेत. नानासाहेब महाडिकांसह युवक नेते राहुल महाडिक यांच्याही उमेदवारीची चर्चा आहे.
मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील कसबे डिग्रज मंडलमधील आठ गावांचा समावेश इस्लामपूर मतदारसंघात झाला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात पिछाडीवर पडूनही महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांना कसबे डिग्रज मंडलमधील आठ गावांतून ७ हजार ८०० चे मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये मुख्य मुद्दा ऊसदर आंदोलनाचा असला, तरी राजारामबापू साखर कारखान्याने या परिसरातील किती ऊस नेला, हा मुद्दाही गाजला होता. राष्ट्रवादीचे खंदे प्रचारक संचालक दिलीप पाटील यांना यावर्षी ‘२६५ जातीचा ऊस खात्रीने नेतो,’ असे जाहीरपणे सांगावे लागले, इतपत हा मुद्दा गाजला होता.
सध्या महायुतीकडून सदाभाऊ खोत, अभिजित पाटील, वैभव नायकवडी यांच्यासह नानासाहेब महाडिक आणि राहुल महाडिक यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र त्यातील फक्त महाडिक गटाकडूनच संपर्क बैठका, भेटीगाठी सुरू आहेत. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करण्यात ते कमी पडणार नाहीत, असे सांगितली जाते. एकीकडे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आढावा बैठका, विकास कामांचा प्रारंभ, उदघाटने करीत आहेत, तर दुसरीकडे महाडिक गट संपर्क वाढवत आहे.

काट्याची लढत होण्याची शक्यता
परिसरात शिवसेना, भाजपची मर्यादित ताकद आहे. काही गावात तर कार्यकर्तेच नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मर्यादा येतात. परंतु लोकसभा निवडणुकीवेळी मोदी लाट, भाजप, शिवसेना, स्वाभिमानीचे कार्यकर्ते, संभाजी पवार गट, काँग्रेसची साथ, सर्वोदयचे असंतुष्ट सभासद आणि ऊस आंदोलनाच्या जोरावर राजू शेट्टींना मोठे मताधिक्य मिळाले. त्यावेळी नानासाहेब महाडिक व भीमराव माने आघाडीचा धर्म पाळत प्रचार करत होते. माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर महाडिक यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे निवडणुकीत काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.

Web Title: Alliance, NCP's attention on Miraj west part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.