शिक्षक बँकेवर विरोधकांचे वैफल्यातून आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:51+5:302021-09-18T04:28:51+5:30
सांगली : शिक्षक बँकेतील विरोधी संचालकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. बँकेची स्थिती मजबूत असून, सत्ताधारी शिक्षक समितीने सभासदांच्या ...

शिक्षक बँकेवर विरोधकांचे वैफल्यातून आरोप
सांगली : शिक्षक बँकेतील विरोधी संचालकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. बँकेची स्थिती मजबूत असून, सत्ताधारी शिक्षक समितीने सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. येत्या सर्वसाधारण सभेतही सभासदांच्या शेअर्स वर्गणी व शेअर्स कपात करण्याचा पोटनियम दुरुस्त केला जाणार आहे. विरोधकांना बँकेचे कामकाजच कळलेले नाही, असा टोला अध्यक्ष यु. टी. जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत लगावला.
शिक्षक बँकेची वार्षिक सभा रविवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती दिली. ते म्हणाले की, विरोधकांच्या सत्ताकाळात एकदाही कर्जावरील व्याजाचे दर कमी झालेले नव्हते. उलट गेल्या सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने व्याजाचे दर कमी करून सभासदांना दिलासा दिला. मुद्रांकाच्या माध्यमातून सभासदांचे लाखो रुपये वाचविले. मयत सभासदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. मृत सभासदांचे २० लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आता १०० टक्के कर्जमाफीचा विचार सुरू आहे.
यंदा पोटनियम दुरुस्तीत सभासदांची शेअर्स वर्गणी ५०० रुपयांवरून १०० रुपये आणि ६ टक्के शेअर्स कपातीत दुरुस्ती करून २.५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सभासदांना ८ ते ९ कोटींचा फायदा होणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे गतवर्षीचा लाभांश भांडवलात जमा केला आहे. तरीही विरोधकांकडून वैफल्यातून बँकेवर आरोप केले जात आहेत. बँकेच्या ठेवी ५१७ कोटी झाल्या असून, यंदा ३ कोटी ३३ लाख रुपयांचा नफा झाला आहे. त्यातून लाभांश देण्याची शिफारस केली आहे. याशिवाय आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम सेवाही सुरू केल्या. बँकेत विरोधक हवा, पण तो अभ्यासू असावा. आताच्या विरोधकांना बँक कळलीच नाही. केवळ सभासदांची दिशाभूल करण्याचा एकमेव उद्योग सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, उपाध्यक्ष राजाराम सावंत, किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, किसन पाटील, दयानंद मोरे, तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे यांच्यासह संचालक उपस्थित होते.